Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत

Nashik : अजब कारभार, पीएम किसान पोर्टलवर जिवंत शेतकरी मृत
Published on
Updated on

संदीप भोर (सिन्नर, नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा सन्मान राखण्याच्या उद्देशाने पीएम किसान सम्मान योजना सुरू केली. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना दर तिमाहीला दोन हजारांचे अनुदान दिले जाते. मात्र या योजनेच्या पोर्टलवर सिन्नर तालुक्यातील एका ६७ वर्षीय शेतकऱ्याला चक्क जिवंतपणीच मृत दाखवून योजनेच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या गंभीर प्रकाराबाबत संबंधित शेतकऱ्याने तहसील कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केला आहे. तथापि, दहा दिवसांनंतरही तहसीलदारांनी या गंभीर प्रकाराची साधी दखल घेतलेली नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

सिन्नर तालुक्यातील मेंढी येथील वृद्ध शेतकरी सुभाष काळू गिते यांना २०१९ मध्ये पीएम किसान योजनेंतर्गत दोन हप्त्यांचा लाभ मिळाला होता. मात्र त्यानंतर अचानक योजनेचा लाभ मिळणे बंद झाले. मात्र नंतरच्या काळात कोविडचे संकट आले. त्यामुळे कदाचित योजनेचा लाभ मिळाला नसेल अशी शक्यता गिते यांनी गृहीत धरली. गेल्या काही महिन्यांत शासन स्तरावरून पुन्हा शेतकऱ्यांना केवायसीसाठी आवाहन करण्यात आले. त्यामुळे गिते यांनी केवायसी अपडेट करण्यासाठी वडांगळी महा ई-सेवा केंद्र गाठले. केंद्रचालकाने केवायसी अपडेट करण्यास घेतल्यानंतर त्याला आणि गिते यांनाही धक्का बसला. पोर्टलवर 'बेनीफीशयरी इज इनॅक्टिव्ह ड्यू टू डेथ' असा संदेश दाखविण्यात आला होता…

शेवटचा उपाय म्हणून २७ मार्च २०२३ ला सुभाष गिते यांनी तहसील कार्यालयात तहसीलदारांच्या नावे अर्ज दिला. त्यात घडलेली गंभीर बाब निदर्शनास आणून देऊन पीएम किसान योजनेचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली. अर्जासोबत बँकेचे पासबुक, आधारकार्ड, पॅनकार्ड व सातबारा उताऱ्याची झेरॉक्स प्रत जोडण्यात आली. तहसील कार्यालयाने त्यांना तोंडीच दोन-तीन दिवसांत काय ते कळवू असे सांगितले. मात्र, आठ  दिवस उलटूनही तहसील कार्यालयातून काहीही विचारणा झाली नाही. त्यामुळे गिते यांनी पुन्हा तहसीलचा उंबरा झिजवत सोमवारी (दि.३) अर्ज दाखल केला. मात्र, अद्यापही त्यांच्या अर्जाची दखल घेण्यात आलेली नाही. तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी तर असा काही प्रकारच आपल्यापर्यंत आलेला नसल्याचे सांगून कानावर हात ठेवले आहेत. त्यावरून ढिम्म प्रशासनचा भोंगळ कारभार समोर आला असून, या प्रकाराने वडांगळी पंचक्रोशीत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

मला मृत्यूचा दाखला द्या 

या प्रकारानंतर गिते यांनी थेठ तलाठी कार्यालय गाठले. तलाठ्याने ही आपली चूक नसल्याचे सांगितले. मग गिते यांनी ग्रामपंचायतीत जाऊन उपरोधाने 'मृत्यूचा दाखला' मागितला. त्यावर ग्रामपंचायत प्रशासनाची भंबेरी उडाली. 'तुम्ही जिवंत असताना मृत्यूचा दाखला द्यायचा कसा?' असा सवाल प्रशासनाने केला. दप्तरही तपासले. त्यांचीही चूक नसल्याचे आढळले.

तक्रारच आलेली नाही 

तहसीलदार बंगाळे अशी कोणतीही तक्रार – आपल्याकडे आलेली नाही. मला या प्रकाराबाबत काहीही माहिती नाही. त्यामुळे माहिती घेऊन त्यावर कार्यवाही करण्यात येईल, असे तहसीलदार एकनाथ बंगाळे यांनी पुढारीशी बोलताना सांगितले.

'मी वाट बघतोय, पण फोन आलाच नाही'

सिन्नरला तहसील कार्यालयात दोनदा चकरा मारल्या. अर्ज दाखल केलेला आहे. त्याची पोच माझ्याकडे आहे. शासनाच्या योजनेचा लाभ मिळाला नाही. यापेक्षा मला जिवंतपणी मृत दाखविले हा प्रकार गंभीर आहे. दोनदा पाठपुरावा करूनही अर्जाची दखल घेतली गेली नाही. फक्त तुम्हाला दोन दिवसांत फोन करतो एवढेच सांगण्यात आले, अशी कैफियत वृद्ध शेतकरी सुभाष गिते यांनी 'पुढारी'कडे मांडली.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news