

सिंधुदुर्गनगरी; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाचे आरक्षण त्यांना मिळालेच पाहिजे. मात्र कुणबी आदी विषयाशी आपण सहमत नाही असे सांगतानाच ओबीसी किंवा अन्य कोणत्याही प्रवर्गाचे आरक्षण काढून मराठा समाजाला आरक्षण नको. तर वाढीव आरक्षणामधून मराठ्यांना आरक्षण मिळावे. राज्यात एकूण 34 टक्के मराठा समाज आहे. त्यापैकी 16 टक्के मराठा समाज गरीब आहे. त्यांना कोणत्याही अटीविना आरक्षण मिळाले पाहिजे असे आपले स्पष्ट मत असल्याचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
केंद्रीय मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्हा दौर्यावर असून, त्यांनी सोमवारी येथील एसएसपीएम हॉस्पिटल येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ना. राणे म्हणाले, मराठा समाजाचे आरक्षण हे त्यांना मिळालेच पाहिजे. पण कुणबी आदी विषयास आपली सहमती नाही. राज्यात एकूण 34 टक्के एवढा मराठा समाज आहे. त्यामधील 16 टक्के एवढा समाज खूप गरीब आहे. त्या सर्वांना कोणत्याही अटीविना आरक्षण मिळाले पाहिजे ही आपली भूमिका आहे. मराठा समाजाने कधीही कोणाला धमक्या दिल्या नाहीत किंवा कोणाच्या धमकीला भीक घातली नाही. मराठा समाजाचे महाराष्ट्र घडवण्यामध्ये फार मोठे योगदान आहे. त्यामुळे आम्हाला आरक्षण ओबीसी किंवा इतर कोणत्याही प्रभागाचे काढून आम्हाला आरक्षण नको. संविधानातील 15 /4 प्रमाणे शैक्षणिक आर्थिक आदी सर्व बाबी समजून घेऊन आरक्षण द्यावे असे ना.राणे यांनी स्पष्ट केले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सन 2011- 12 या वर्षांमध्ये पास झालेले बरेच डीएड बेरोजगार नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ते पुन्हा पुन्हा माझ्याकडे येत असतात. रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये ज्याप्रमाणे डीएड बेरोजगारांची भरती केली आहे त्याप्रमाणेच सिंधुदुर्गातील डीएड बेरोजगारांची भरती करावी असे आपण शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या भेटीमध्ये स्पष्ट केले.ते त्यांनी मान्य केले असून, या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतील. या नियुक्त्या झालेल्या डीएड बेरोजगारांना मानधन मिळेल.मात्र कायमस्वरूपी भरती व्हावी यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्यासोबत आपण बसून तशी रचना लावणार असल्याचे ना राणे यांनी सांगितले.
31 डिसेंबरपर्यंत सरकार जाईल असे आदित्य ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील त्यांच्या दौर्यात सांगितले. यावर नारायण राणे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले, सरकार जाणे वगैरे सोडा. काही दिवसांनी सुशांत केसमध्ये आदित्य ठाकरे तुरुंगात दिसेल. त्याच्याबरोबर संजय राऊतही असेल.आदित्य ठाकरे म्हणजे बावळट आहे. त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. मात्र मोठमोठ्या सभेंवरून खळा सभा घ्यावा लागतात म्हणजे शिवसेना किती अधोगतीला गेली त्याचे प्रतीक आहे. त्यांच्याकडे केवळ 16 आमदार राहिले आहेत. पुढच्या वेळी 16 पैकी 5 पण असणार नाहीत असे सांगतानाच मुख्यमंत्रीपद असताना अडीच वर्षात ही माणसे घरातून बाहेर पडली नाहीत ती आता सत्ता गेल्यावर दारोदारी हिंडत आहेत असा टोला राणे यांनी लगावला.
सध्याचे राज्यातील सरकार हे अस्थिर आहे असे सुप्रिया सुळे यांनी वक्तव्य केले आहे. याबाबत राणे यांना विचारले असता ते म्हणाले, हे सरकार अस्थिर आहे हे ताईंना कशावरून वाटते ? त्यांनी काय खांबे हलवून बघितलेत ? आता अधिवेशन होईल. त्या अधिवेशनामध्ये तुमच्या पक्षाला या सरकारवर अविश्वास ठराव आणायला सांगा म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे सरकार अस्थिर आहे की स्थिर आहे. राज्यातील आमचे सरकार पूर्णपणे एकमताने आणि एकदिलाने काम करत आहे. बोलणार्यांना कसेही बोलता येईल. पण त्याचा कोणताही परिणाम आमच्यावर होणार नाही असे सांगतानाच गेल्या नऊ वर्षातील भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांचे काम पाहता पाचही राज्यात भाजपा सरकार येईल हे मी माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून सांगतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.