

सांगली; पुढारी वृत्तसेवा : सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली नाही, याचे सर्वात जास्त दुःख कुटुंबप्रमुख म्हणून मला आहे. मी एका षड्यंंत्राला फसलो. ज्यांनी सांगली काँग्रेसच्या एकीला द़ृष्ट लावली, त्यांची द़ृष्ट आपण उतरवल्याशिवाय राहणार नाही. चारच महिन्यांवर विधानसभा निवडणूक आहे, त्यावेळी दाखवून देऊ, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी येथे काँग्रेसच्या मेळाव्यात दिला.
येथील विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या आवारात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री रमेश बागवे, आमदार विक्रम सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आदी उपस्थित होते.
पटोले म्हणाले, आपण मध्यस्थी करून जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध केली. पण, आता तिला द़ृष्ट लावण्याचे काम सुरू आहे. त्यांची द़ृष्ट उतरवल्याशिवाय हा नाना शांत बसणार नाही. सांगलीला जागा मिळाली नाही, याचा तुम्हाला जितका त्रास झाला, त्यापेक्षा जास्त मला झाला. एका षड्यंत्रात नाना फसला; पण आता त्यातून कसं बाहेर पडायचं, हे मला माहिती आहे. तुमच्या वेदनेला न्याय मिळवून द्यायचे काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. ज्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी देशासाठी काम केले, त्यांना भाजपने ईडी कार्यालयापर्यंत नेले. राहुल गांधी यांना धक्काबुक्की केली. जनता भाजप सरकारला माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
बाळासाहेब थोरात म्हणाले, हुकूमशाही आणि दहशतवादाकडे चाललेला देश आता कोणत्या वळणावर न्यायचा, हे ठरवणारी ही निवडणूक आहे. राज्यातही हेच चित्र आहे. सत्तेसाठी भाजपने पक्ष फोडले. प्रत्यक्ष पंतप्रधानांनी ज्यांच्यावर 70 हजार कोटींचा आरोप केला, ते भाजपात गेल्यावर सारे आरोप हवेत विरले. सत्तेसाठी भाजप भ्रष्ट प्रवृत्तीचा वापर करतो आहे. पण, भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने एकत्रितपणे आपण लढतो आहोत. काँग्रेसला अतिशय अनुकूल वातावरण आहे.
ते म्हणाले, लोकसभेच्या सांगलीच्या जागेचा प्रश्न अत्यंत बिकट होता. मित्रपक्ष आणि स्वपक्ष असा दोन्ही बाजूंनी आमच्यावर दबाव होता. सांगलीच्या जागेसाठी दिल्लीतून सारे पक्षप्रमुख मुंबईत येऊन बसले होते; पण मित्रपक्षाने मान्यता दिली नाही. यानंतर विशाल यांनाही काय पाहिजे ते घ्या, अशी ऑफर दिली; पण तिढा सुटला नाही. देशात अनेक ठिकाणी सांगलीसारख्याच अडचणी काँग्रेससमोर आल्या. तुमच्या भावना दिल्लीपर्यंत सार्यांना माहिती आहेत, पण ऐतिहासिक निर्णयाच्यावेळी तुम्ही कसे वागता, हे महत्त्वाचे असते.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, सांगली जिल्ह्याने लोकसभेसाठी एकमताने एकच नाव दिले होते. सांगलीपासून दिल्लीपर्यंत या नावाबाबत कोणाचेही दुमत नव्हते. विश्वजित यांनी शेवटपर्यंत लढा दिला, पण बरेच राजकारण झाले. मागच्यावेळीही असेच राजकारण झाले होते. हे राजकारण आता हळूहळू पुढे येईलच.
ते म्हणाले, तीन-तीन पक्षांची आघाडी असल्यामुळे काँग्रेसला कमी वाटा मिळणार होता. तरीही आग्रह जोरात होता. हमखास निवडून येणार्या जागांपैकी सांगली एक नंबरवर होती. पण पुढच्या पक्षाने हट्ट सोडला नाही. आघाडीची किंमत सांगलीला मोजावी लागली. सांगली जिल्ह्यातील काँग्रेस एकसंध आणि अबाधित राहिली पाहिजे आणि दुसर्या बाजूला भाजपचा पराभव झालाच पाहिजे, असे दुहेरी आव्हान पेला.
डॉ. विश्वजित कदम म्हणाले, सांगलीच्या जागेसाठी जिल्ह्यातील कॉँग्रेसने एकमुखाने आमच्या तरुण मित्राचे नाव दिले. त्यासाठी तीन महिने दिल्लीपर्यंत आपण पाठपुरावा केला. वाईटपणा घेतला. तुम्हीही सारे वरिष्ठ याला दुजोरा देत राहिलात. पण अचानकच उध्दवसाहेबांनी सांगलीत येऊन त्यांच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. लोकशाहीत असं होतं का? असा सवाल त्यांनी केला. सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला देणं चुकीचं आहे. आम्ही सारे प्रयत्न केले, पण आमचा तोंडचा घास हिसकावून घेतला. आघाडीत बिघाडी होताना आपण लक्ष का दिलं नाही? असा जाब त्यांनी विचारला. मित्रपक्षाला सांगा, 100 टक्के काँग्रेसची मते मिळणार आहेत, पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही. यापुढे मी हे होऊ देणार नाही. याचा वचपा नक्की विधानसभेमध्ये काढू, असा इशारा त्यांनी दिला. सापशिडीच्या खेळाप्रमाणे दुर्दैवाने आम्हाला साप चावला. पण शेवटी विजय हा आमचाच असेल, असे त्यांनी सांगितले.
खा. संजय राऊत यांनी विशाल यांच्या विमानाचे पायलट विश्वजित आहेत, त्यांचे विमान गुजरातला जाईल, अशी टीका केली होती. यावर विश्वजित यांनी, कुणाचे विमान कुठे गेले हे मला सांगायची गरज नाही. आमचे विमान मात्र छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या चरणाशी थांबेल असे सांगितले.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी, निवडणुकीच्या निमित्ताने सांगलीचे नाव देशात पोहोचले. उमेदवारीवर आतापर्यंत वाद होत, पण यावेळी एकमुखी नाव दिले होते असे सांगितले. स्वागत आमदार विक्रम सावंत यांनी केले. सर्व तालुकाप्रमुखांनी मनोगते व्यक्त केली.
भावे नाट्यगृहाच्या आवारात सार्या खुर्च्या गर्दीने भरलेल्या होत्या. अनेक लोक उन्हात उभे राहून नेतेमंडळींची भाषणे ऐकत होते. सुरुवातीपासून असणारी गर्दी अगदी शेवटपर्यंत होती.
शिवसेनेला जागा देणे ही चूक, तशी बंडखोरी पण नको होती.
आघाडीच्या बैठकीत कोण तरी काही तरी करत होते, तेव्हा वरिष्ठांनी बारकाईने लक्ष का ठेवले नाही?
जिल्ह्यातील काँग्रेस एकत्र आल्याने कुणाची तरी द़ृष्ट लागली; पण द़ृष्ट लावणार्या व्यक्तीचा वचपा काढू.
ज्यांनी कट-कारस्थान केले त्याला सोडणार नाही.
आम्हाला सांगलीत येऊन डिवचले का? आमचे विमान हे छत्रपती शिवाजी महाराज, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या चरणाशी होते आणि राहील.
विशाल पाटील यांना राज्यसभेची ऑफर दिली, पण त्यांनी एकले नाही.
बंडखोरी करू नको, काहींच्या जाळ्यात फसू नको, कारण लोकसभेत बंडखोरी सोपी नसते, हे विशालला सांगितले होते.