अर्धपुतळे हटविण्याच्या घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी नामांतर : अजित पवार

अर्धपुतळे हटविण्याच्या घटनेवरून लक्ष विचलित करण्यासाठी नामांतर : अजित पवार
Published on
Updated on

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावकर यांच्या जयंतीदिनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धपुतळे हटविण्यावरून सुरू झालेले निषेध आंदोलन तसेच धनगर आरक्षणावरून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी अहमदनगरचे 'अहिल्यानगर' असे नामांतर करण्यात आल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केला. गुलटेकडीतील सहकारी पतसंस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजिलेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, सध्या अहमदनगरचे नामांतर व्हावे यासाठी कोणतेही आंदोलन पेटले नव्हते किंवा या स्वरूपाची मागणी नव्हती. मात्र, सध्याच्या सरकारमधून महापुरुषांबद्दल वारंवार बेताल वक्तव्य करण्यात आली. त्यामध्ये वाचाळवीरांची आणखी भर पडली. यापूर्वी सत्तेत असताना सरकारने धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला होता. तो पूर्णत्वास न गेल्याने सरकारने नामांतराचा मुद्दा पुढे आणला आहे.

तसेच, लोकांचे मन वळविण्याचा सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे. अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव मिळाले याचे स्वागत आहे. महापुरुषांचे स्मरण तसेच त्यांच्या विचाराचा प्रसार होणे आवश्यक आहे. मात्र, ते करत असताना राजकीय स्वार्थ डोळ्यांसमोर ठेवू नये. पवार म्हणाले, मुंबईमधील जे. जे. रुग्णालयाच्या डिन, प्रमुख डॉक्टरांनी दोन दिवसांपूर्वी राजीनामा दिला आहे.

तेथील डॉक्टर सामूहिक संपावर गेल्याने रुग्णांचे हाल सुरू आहेत. रुग्णालयाच्या विविध अडचणींवर चर्चेने मार्ग काढण्याची आवश्यकता असून, ते करण्यास सरकार कमी पडत असल्याचे दिसून येते. ही बाब अतिशय गंभीर आहे. सत्ताधार्‍यांनी विधानसभेतही लव जिहादचा मुद्दा काढला, मात्र प्रत्यक्षात अत्यंत कमी संख्या समोर आली. धर्म असो की जात यांमध्ये एकमेकांबद्दल आदर ठेवावा. तेढ, दुही, द्वेष निर्माण होईल असे कोणी करू नये, असेही पवार यांनी नमूद केले.

…म्हणून अदानी व शरद पवार यांची भेट

उद्योगपती गौतम अदानी व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या यापूर्वीही भेटी झाल्या आहेत. उद्योग करताना येणार्‍या अडचणी, समस्या याबाबत या भेटीमध्ये चर्चा होत असते. अदानींच्या बाबतीत हिंडेनबर्गचा प्रश्न निघाला असला, तरी त्यांच्या विविध राज्यांत गुंतवणूक तसेच प्रकल्प सुरू असल्याचे मत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पवार आणि अदानी यांच्या भेटीवर विचारलेल्या प्रश्नावर व्यक्त केले.

सहकार कायद्यातील बदलावर न्यायालयीन लढाई लढू

सर्वसाधारण सभेला उपस्थित न राहणार्‍या सदस्यांचा मतदानाचा अधिकार काढून घेणे आणि त्यांना निवडणूक लढविण्यास मनाई करणार्‍या सहकार कायद्यातील बदलास राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोध दर्शविला आहे. या निर्णयाच्या अध्यादेशाची मी वाट पाहत आहे, असे नमूद करीत, या विषयावर न्यायालयीन लढाई होण्याची शक्यताही त्यांनी वर्तविली.

तोलणार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्था रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी डॉ. बाबा आढाव, पतसंस्थेचे अध्यक्ष बबन घुले, संस्थापक हनुमंत बहिरट, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, उपसभापती रवींद्र कंद, संचालक गणेश घुले, बापू भोसले, संतोष नांगरे आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news