MI vs SRH : विजयाचा सूर्य-तिलक; मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा धक्का

MI vs SRH : विजयाचा सूर्य-तिलक; मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादला पराभवाचा धक्का
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : 'आयपीएल 2024'मध्ये गुणतालिकेत तळाच्या स्थानावर ठाण मांडून बसलेल्या मुंबई इंडियन्सला अखेर विजय गवसला. सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादला 7 विकेटस्नी हरवले. सूर्यकुमार यादवने शतक झळकावत मुंबईच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. सनरायझर्सने प्रथम फलंदाजी करताना 8 बाद 173 धावा केल्या, हे आव्हान मुंबईने 16 चेंंडू राखून पूर्ण केले. या विजयाने मुंबई इंडियन्स संघ तळातून एक स्थान वर म्हणजे नवव्या स्थानावर आला आहे. तर हैदराबादच्या पराभवाने चेन्नई सुपर किंग्जचा थोडा फायदा झाला आहे.

इशान किशन व रोहित शर्मा यांनी मुंबईला पहिल्याच षटकात 13 धावा कुटून दिल्या. मार्को जान्सेनच्या दुसर्‍या षटकात 13 धावा आल्या होत्या. परंतु, त्याने इशानला (9) स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडले. भुवनेश्वर कुमारने अप्रतिम इनस्वींगवर नमन धीरला अचंबित केले होते. भुवीने चांगले दडपण निर्माण केले होते आणि त्याचा फायदा पॅट कमिन्सने चौथ्या षटकात उचलला. रोहित शर्मा (4) याने मारलेला चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि हेन्रिक क्लासेनने सहज झेल टिपला. मुंबईला 31 धावांवर दोन धक्के बसले. कमिन्सने त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर सूर्यकुमार यादवला चकवले. सूर्याला काहीच समजेनासे झाले. मुंबईचे फलंदाज दडपणात दिसले आणि भुवीने पुढच्या षटकात नमनला भोपळ्यावर (9 चेंडू) माघारी पाठवले. बिनबाद 26 वरून मुंबईचा डाव 3 बाद 31 असा घसरला.

सुरुवातीला मोठे धक्के बसल्यानंतर मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी सावरला. त्यांनी मुंबईला 100 धावांचा टप्पा सहज पार करून दिला. या दरम्यान सूर्यकुमारने 30 चेंडूंत त्याचे अर्धशतक पूर्ण केले. अर्धशतक केल्यानंतरही सूर्यकुमारने आपली लय कायम ठेवली आणि शतक ठोकले. या सामन्यात मुंबईला विजयासाठी 6 धावांची गरज असताना सूर्यकुमारने 18 व्या षटकाच्या दुसर्‍या चेंडूवर टी नटराजनविरुद्ध खणखणीत षटकार ठोकला आणि शतक पूर्ण करण्याबरोबरच मुंबईच्या विजयावरही शिक्कामोर्तब केले. त्याने 51 चेंडूंत 12 चौकार आणि 6 षटकारांसह 102 धावांची नाबाद खेळी केली. त्याला तिलक वर्मानेही 32 चेंडूंत 37 धावांची नाबाद खेळी करत भक्कम साथ दिली. 3 बाद 31 धावा अशा स्थितीतून या दोघांनी 143 धावांची नाबाद भागीदारी करत मुंबईला 7 विकेटस्ने विजय मिळवून दिला. हैदराबादकडून भुवनेश्वर कुमार, मार्को जान्सेन आणि पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पूर्वी, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी दम दाखवला. टी-20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी हार्दिक पंड्याचे फॉर्मात येणे भारतासाठी शुभ संकेत आहेत. त्याने हैदराबादच्या 3 फलंदाजांना माघारी पाठवले. 35 वर्षीय फिरकीपटू पीयूष चावलाने 3 मोठ्या विकेटस् घेऊन सामन्याला कलाटणी दिली. जसप्रीत बुमराहने त्याची इकॉनॉमी कायम राखताना 23 धावांत 1 विकेट घेतली. पदार्पणवीर अंशुल कंबोज थोडा कमनशीबी ठरला. कारण, त्याच्या चेंडूवर ट्रॅव्हिस हेडला दोनवेळा जीवदान मिळाले; पण त्याने 42 धावांत 1 विकेट घेतली. नुवान तुषारा (42) हाही महागडा ठरला. हैदराबादकडून हेडने 30 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह 48 धावा केल्या. कर्णधार पॅट कमिन्सने 17 चेंडूंत नाबाद 35 धावा करून संघाला 8 बाद 173 धावांपर्यंत पोहोचवले. नितीश कुमार रेड्डी (20), मार्को जान्सेन (17) यांनीही योगदान दिले.

संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : 20 षटकांत 8 बाद 173 धावा. (ट्रॅव्हिस हेड 48, पॅट कमिन्स 35. हार्दिक पंड्या 3/31.)
मुंबई इंडियन्स : 17.2 षटकांत 3 बाद 174 धावा. (सूर्यकुमार यादव 102*, तिलक वर्मा 37*. भुवनेश्वर 1/22.)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news