ताडदेव आग प्रकरण : पालिका उपायुक्‍तांची चौकशी समिती; १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे आदेश

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
Published on
Updated on

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा

ताडदेवमधील सच्चिनम हाईट्स इमारतीमध्ये १९ व्या मजल्यावर काल (शनिवार) आग लागल्‍याची घटना घडली होती. या आगीच्या दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने उपायुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली आहे. तसेच या समितीने पुढील १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या दुर्घटनेत सहा नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला असून, अन्य २३ जण जखमी झाले आहेत.

कमला डेव्हलपरने विकसित केलेल्या सच्चिनम हाईट्स या २० मजली इमारतीमध्ये लागलेल्या आगीत सहा नागरिकांना हकनाक जीव गमवावा लागला. अग्निशमन दलाच्या १३ फायर इंजिन, ८ जम्बो टँकर आणि उंच शिडीची वाहनांच्या मदतीने पाच तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवता आले. मात्र आग आणि धूर यांमुळे इमारतीतील रहिवाशांना घरातून व व्हरांड्यातून बाहेर पडणे कठीण जात असल्याने ते अडकून पडले होते. अशा स्थितीत अग्निशमन दलाने इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यावरून सुमारे २५ ते २६ रहिवाशांची तातडीने सुटका केली.

आगीच्या या घटनेची चौकशी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी समिती नेमण्याचे आणि १५ दिवसांच्या आत दुर्घटनेचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेचे उप आयुक्त (परिमंडळ २) यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन झाली आहे. या समितीमध्ये डी विभागाचे सहाय्यक आयुक्त, प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत), उपप्रमुख अभियंता (इमारत प्रस्ताव) (शहर), उपप्रमुख अग्निशमन अधिकारी यांचा समावेश आहे. आग लागल्याचे नेमके कारण, आग पसरून सहा नागरिकांचा मृत्यू होण्यामागील कारण आणि सदर इमारतीच्या मंजूर आराखड्यामध्ये कोणतेही विनापरवानगी बदल करण्यात आले असल्यास त्याची शहानिशा करणे या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

मुंबईत २२३ बहुमजली इमारतींना नोटीसा…

१८ नोव्हेंबर २०२१ ते ८ जानेवारी २०२२ या कालावधीमध्ये महानगरपालिकेने २२३ बहुमजली उंच इमारतींचे परीक्षण करून त्यांना 'महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक आणि जीवन रक्षण उपाययोजना अधिनियम २००६' अंतर्गत नोटिसा बजावल्या आहेत. अग्निशमन उपाय योजना यंत्रणा व साधनांचे योग्य रीतीने परिरक्षण न करता त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल या नोटिसा दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news