मुंबई : मेट्रो लाईन ३ ट्रेनची ‘ही’ आहेत वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर

मेट्रो लाईन ३ ट्रेन
मेट्रो लाईन ३ ट्रेन
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : मुंबई मेट्रो ३ च्या पहिल्या भूमिगत ट्रेन चाचणीचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सारीपुत नगर, आरे कॉलनीत झाला. या मेट्रो लाईन ३ (कुलाबा- बांद्रा-सिप्झ कॉरिडॉर) ट्रेनची 'ही' आहेत वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर

  • मुंबई मेट्रो लाईन -३ च्या ट्रेन या ८ डब्यांच्या असतील. ७५% Motorisation मुळे गाड्यांच्या धावण्याची कार्यक्षमता उत्तम असणार आहे.
  • रिजनरेटिव्ह ब्रेकिंगमुळे सुमारे ३० टक्के विद्युत उर्जेची बचत होईल आणि चाक, ब्रेक ब्लॉक्स इत्यादी उपकरणांची झीज कमी होईल.
  • एका गाडीतून एकाचवेळी अंदाजे २४०० प्रवासी प्रवास करू शकतील.
  • ८५ किमी प्रति तास वेगामुळे प्रवाशांचा एकूण प्रवासासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे.
  • स्टेनलेस स्टीलच्या वापरामुळे मेट्रोचे डबे किमान ३५ वर्षे टिकू शकतील.
  • ट्रेन प्रचालनासाठी चालक विरहित प्रणाली बसवण्यात आली आहे. अत्याधुनिक कम्युनिकेशन अधारित ट्रेन कंट्रोलच्या (CBTC) सिग्नल व्यवस्थेमुळे १२० सेकंदची frequency ठेवणे शक्य होणार आहे.
  • प्रवाशांच्या सुलभतेसाठी डब्याच्या प्रत्येक बाजूला चार दरवाजे असतील.
  • स्वयंचलित प्रकाश नियंत्रण वैशिष्ट्यांसह अद्ययावत वीज प्रणाली ऊर्जेचा वापर कमी करण्यास मदत करेल.
  • ट्रेनच्या छतावर स्थित व्हेरिएबल व्होल्टेज, व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी (VVVF) प्रणालीद्वारे वातानुकूलन यंत्रणेचे नियंत्रण केल्याने ४ ते ५ टक्के ऊर्जा बचत होईल.
  • डब्यांमध्ये वातानुकूल यंत्रणेअंतर्गत कार्बन डायऑक्साइड आणि आर्द्रतेसाठी स्वयंचलित नियंत्रण प्रणाली असल्याने सर्व हवामान परिस्तिथीमध्ये प्रवाशांना उत्तम आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल.
  • रोलिंग स्टॉक आणि ट्रॅक या दोन्ही डिझाइनची योग्यता सिद्धता करता यावी. आवश्यकतेप्रमाणे नवीन तांत्रिक सुधारणा कराता याव्यात म्हणून 'मुंबई मेट्रो लाइन -३' या संपूर्ण भूमिगत मर्गिकेवर आज ट्रेन चाचणी करण्यात आली.
  • सेवा चाचण्यांचे नियोजन लाईन 3 साठी डेपो सुविधेसोबत आवश्यक संख्येने ट्रेन संच उपलब्ध झाल्यानंतर केले जाईल.

मेट्रो ३ प्रकल्प सुविधेबरोबर पर्यावरणाचा समतोल : मुख्यमंत्री शिंदे

राज्य शासन पायाभूत सुविधांना प्राधान्य देत आहे. त्याअंतर्गत मुंबईकरांसाठी नव्याने लाईफ लाईन ठरणारा मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करणारा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन राज्याला प्रगतीपथावर नेणाऱ्या कामांना प्राधान्य देत आहे. मेट्रो ३ च्या पूर्णत्वानंतर या ट्रेनमधून सुमारे १७ लाख प्रवासी प्रवास करू शकणार असून यामुळे रस्त्यावरील सुमारे सात लाख खासगी वाहनांची संख्या कमी होईल. यामुळे वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच वायू आणि ध्वनी प्रदूषण देखील कमी होईल. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होईल.

ज्या राज्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उत्तम असते, तेथील नागरिक त्याचा वापर करतात. पर्यायाने रस्त्यावरील खाजगी वाहतूक कमी होते, असे सांगून बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा सुद्धा शासनाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूर ते मुंबई पर्यंतच्या अनेक जिल्ह्यांना लाभ होणार असून, लवकरच या मार्गाच्या नागपूर शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे जनहिताच्या प्रत्येक प्रकल्पासाठी राज्य सरकारच्या पाठीशी आहेत. राज्य आणि केंद्र सरकार मिळून विविध महत्त्वाचे प्रकल्प गतीने पूर्ण करू, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. मेट्रो ३ च्या यशस्वी चाचणीसाठी त्यांनी श्रीमती अश्विनी भिडे आणि संपूर्ण टीमचे अभिनंदन करून प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

मेट्रो ३ च्या पूर्णत्वाने आत्मीय समाधान लाभेल – उपमुख्यमंत्री फडणवीस

मुंबई मेट्रो 3 ही मुंबईची महत्त्वाची लाईफ लाईन बनणार आहे. या प्रकल्पाची महत्त्वपूर्ण चाचणी आज यशस्वी झाली. या मेट्रो प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होईल. या मेट्रोमुळे रस्त्यावरील खासगी वाहतूक कमी होणार असल्याने, सुमारे 2.30 लाख टन कार्बन उत्सर्जन कमी होईल. जी झाडे तोडावी लागली त्यांनी जितके कार्बन शोषून घेतले असते, मेट्रोमुळे केवळ ८० दिवसात तेवढे कमी उत्सर्जन होईल, असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुढे ते म्हणाले, हरित लवाद तसेच सर्वोच्च न्यायालयाने सर्व घटकांचा परामर्श घेऊनच या प्रकल्पाला परवानगी दिली आहे. पर्यावरणाचा विचार करूनच मुंबईच्या हितासाठी जो निर्णय घेणे आवश्यक होते, ते निर्णय शासनाने घेतल्याचे आहे. या मेट्रो लाईनमुळे मुंबईतील प्रवाशांना मोठा लाभ होणार असल्याने, हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर आत्मीय समाधान लाभेल, असेही फडणवीस म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news