मुळा-भंडारदर्‍याला अवकाळीचा दिलासा ; नगर-नाशिकचे पाऊण टीएमसी पाणी वाचणार

मुळा-भंडारदर्‍याला अवकाळीचा दिलासा ; नगर-नाशिकचे पाऊण टीएमसी पाणी वाचणार
Published on
Updated on

 मान्यनगर/कोळपेवाडी : पुढारी वृत्तसेवा : नगर आणि नाशिक जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात बसला असला, तरी दोन्ही जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना त्यामुळे काहीसा दिलासाही मिळाला आहे. कारण या पावसामुळेच नगर व नाशिक जिल्ह्यांतून जायकवाडीला सोडल्या जाणार्‍या पाण्यात तब्बल पाऊण टीएमसी पाण्याची कपात करण्यात आली आहे. अवकाळीमुळे उपलब्ध झालेल्या पाण्याचा विषय पुढे करत आमदार आशुतोष काळे यांनी याबाबत जलसंपदा विभागाकडे मागणी केल्याने नगर व नाशिकच्या धरणांमधील पाणी काही प्रमाणात का होईना वाचले आहे.

संबंधित बातम्या :

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन अधिनियम 2005 या कायद्यानुसार अहमदनगर व नाशिकच्या धरणातून जायकवाडी धरणासाठी 8.603 टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. परंतु नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात तसेच धरण क्षेत्रात रविवार (दि.26) रोजी मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे नदीपात्रात पाण्याची आवक सुरू झाल्यामुळे नदीपात्रातील वहनव्यय (पाण्याचे नुकसान) कमी झाले आहे. परिणामी जायकवाडी धरणात सोडण्यात येणार्‍या पाण्याच्या नदीमार्गातील वहनव्ययाचे पाणी कमी करण्याची मागणी आमदार आशुतोष काळे यांनी जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांकडे पत्राद्वारे केली होती.

तसेच संबंधित अधिकार्‍यांना फोनद्वारे माहिती दिली होती. त्या मागणीची दखल घेऊन पाणी सोडण्याबाबत कार्यकारी संचालकांनी फेर नियोजन करण्याचे सुधारित आदेश दिले असून त्यामुळे नगर व नाशिक जिल्ह्याचे जवळपास पाऊण टीएमसी पाणी वाचले आहे. त्यात नाशिकच्या धरणांतील 403 दशलक्ष घनफूटपाणी वाचल्याची माहिती आमदार काळे यांनी दिली. दि. 26 नोव्हेंबर रोजी गोदावरी खोर्‍यात 50 ते 100 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे गोदावरी नदीतून जायकवाडी धरणात पाणी जात असताना वहन तूट होणार नाही. तसेच बहुतांश धरणांमध्ये पावसामुळे नवीन पाण्याची आवक झालेली आहे. त्याचप्रमाणे जायकवाडी धरणातही नवीन पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे वहनव्ययाचे पाणी सोडण्याची आवश्यकता नाही, अशी मागणी आमदार काळे यांनी केली. सद्यःपरिस्थितीची माहिती घेऊन सकारात्मक प्रतिसाद देत नगर-नाशिकच्या धरणांतून पाणी सोडण्याचे फेरनियोजन करण्याचे आदेश कार्यकारी संचालकांनी सबंधित विभागाला दिले आहेत.

वेळीच सजग राहून नगर-नाशिकच्या धरणांतील पाणी जायकवाडीला सोडू नये यासाठी पाठपुरावा करणार्‍या आमदार आशुतोष काळे यांच्या प्रयत्नांना हे यश मिळाले असून वाचणार्‍या पाण्यातून नगर-नाशिकच्या धरण लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news