

तळेगाव ढमढेरे, पुढारी वृत्तसेवा: पालकांनी मुलांवर अतिरिक्त दबाव न टाकता त्यांचे व्यक्तिमत्त्व स्वतंत्रपणे फुलू द्यावे. हाच खरा यशाचा पासवर्ड असल्याचे मत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे विद्यमान अध्यक्ष आणि शिरूर तालुक्याचे भूमिपुत्र किशोर राजेनिंबाळकर यांनी केले. तळेगाव ढमढेरे येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या शैक्षणिक संकुलास बुधवारी (दि. 21) किशोर राजेनिंबाळकर यांनी सदिच्छा भेट दिली. शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्या उपस्थितीत त्यांचे दिमाखदार पद्धतीने स्वागत आणि सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर संस्थेच्या विविध शैक्षणिक उपक्रमांची त्यांनी या वेळी पाहणी केली. त्या वेळी अनौपचारिक चर्चेत त्यांनी वरील मत व्यक्त केले.
शिक्षण प्रसारक मंडळ परिवारातील पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी इत्यादी घटकांशी मनमोकळा संवाद साधत राजेनिंबाळकर यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. यामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले. शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंद ढमढेरे, विद्यमान संचालक महेश ढमढेरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक नवले, आर. बी. गुजर प्रशालेच्या प्राचार्या सुवर्णा चव्हाण आदींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष किशोर राजेनिंबाळकर साहेबांचा यथोचित सत्कार करून स्वागत केले.
राजेनिंबाळकर पुढे म्हणाले की, स्पर्धेच्या आजच्या काळात कोणीही कुणाला कमी लेखता कामा नये. स्पर्धा परीक्षेला सामोरे जात असताना अभ्यासाबरोबरच व्यावहारिक शहाणपण आणि तर्कसंगत बुध्दिमत्ता खूप उपयुक्त ठरणारी आहे. कोणत्याही क्षेत्राचा सखोल अभ्यास आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर नक्की यश मिळेल, असा आत्मविश्वास तरुणांमध्ये असण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला.
या प्रसंगी कौस्तुभकुमार गुजर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सहकार सेल उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र पोलिसमित्र संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र करेकर, सामाजिक कार्यकर्ते विजय घुले, रणजित तकटे, सुरेश ढमढेरे, प्राचार्य डॉ. अशोक नवले, मुख्याध्यापिका सुवर्णा चव्हाण, सुनीता पिंगळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.