

मुदाळतिट्टा : भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथील विनायक पाटील या तरुणाने उपजिल्हाधिकारी पदाला गवसणी घातली आहे. जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, उचित ध्येय, परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यासात सातत्य ठेवल्याने विनायक नंदकुमार पाटील हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत राज्यात पहिला आला. (MPSC Exam)
शेतकरी कुटुंब, गरीब परिस्थिती, मुलाची शिकण्याची जिद्द ओळखून वडील नंदकुमार पाटील यांनी मिळेल तो काम धंदा करून आपल्या कुटुंबाच्या उपजीविके सोबतच मुलाचे शिक्षण सांभाळले. स्वतःचं कुटुंब चालावे यासाठी त्यांनी कधी रिक्षा चालवली तर चहाची टपरी काढून व्यवसाय केला. थोड्याशा शेतीवर कुटुंब अवलंबून असल्यामुळे परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांनी विना संकोच व्यवसायात उडी घेतली.
विनायक हा शालेय जीवनापासून चमक दाखवणारा विद्यार्थी होता. हे त्याच्या गुरुजनांनी ओळखले होते. गावातीलच प्राथमिक शाळेत त्याचे प्राथमिक शिक्षण झाले. येथील प. बा. पाटील माध्यमिक विद्यालयात व कनिष्ठ महाविद्यालयात माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण घेतले. त्याला दहावीमध्ये 93.20 तर बारावीमध्ये 93. 54 असे गुण मिळाले.
दहावीपेक्षा बारावी विज्ञान शाखेत त्याला मिळालेले मार्क हे उल्लेखनीय होते. बीएससी संख्याशास्त्र विषयात त्याने पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमधून पदवी प्राप्त केली. त्याला बीएससीला 82 टक्के मार्क मिळाले. घरची परिस्थिती बेताची असल्याने कोणताही खासगी क्लास न लावता स्वयं अध्ययनाच्या जोरावर त्याने एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या उपजिल्हाधिकारी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवत राज्यात पहिला येण्याचा मान मिळवला.
आठ महिन्यांपूर्वी त्याने उपशिक्षणाधिकारी पदाची परीक्षा दिली होती. त्यामध्ये तो निवड पात्र झाला होता. एसटीआय, एएसओ या परीक्षा ही तो चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झाला होता. विनायकने घेतलेली गरुड भरारी खरोखरच आजच्या युवा पिढीला प्रेरणा देणारी अशीच ठरणार आहे.
परिस्थितीची जाणीव ठेवून ध्येयवेढे झालो. तर, आपणास कठीण असे शिखर सुद्धा सहज गाठता येते. आजच्या तरुणांनी ध्येय वेडे होऊन यश प्राप्त करावे शिक्षण घेण्यासाठी आर्थिक स्थिती चांगली असावीच असे नाही. प्राप्त परिस्थितीत आपल्याला वाटचाल करता येते विना क्लास स्वयं अध्ययनाच्या जोरावर जर आपण प्रयत्नशील राहिलो. तर, आपणास यश मिळते असे मत विनायक नंदकुमार पाटील यानी यावेळी व्यक्त केले. (MPSC Exam)
शिकणाऱ्या मुलाला पाठबळ द्यावे यासाठी आम्ही कुटुंबीयांनी कधीही परिस्थितीची उणीव त्याला जाणू दिली नाही. तो समजदार होता शिकणार होता. मिळेल त्यात समाधान मानणारा होता. कौटुंबिक परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्याने आमच्याकडे कोणताही हट्ट केला नाही. उलट त्याचे शिक्षण पूर्ण व्हावे यासाठी आम्ही शेतीबरोबरच इतर व्यवसाय केले व त्याच्या शिक्षणात हातभार लावला. आपला मुलगा उपजिल्हाधिकारी झाला. जीवनात आणि काय पाहिजे पोरानं आमच्या जन्माचे सार्थक केलं. असे उद्गार वडील नंदकुमार पाटील यांनी दैनिक पुढारीशी बोलताना व्यक्त केले.
nbsp;
हेही वाचा :