यशवंतराव चव्हाणांना मरणोत्तर भारतरत्न द्या : खा. उदयनराजेे

यशवंतराव चव्हाणांना मरणोत्तर भारतरत्न द्या : खा. उदयनराजेे
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : स्व. यशवंतराव चव्हाण यांचे कार्य अतुलनीय असल्याने त्यांचा सर्वोच्च भारतरत्न पुरस्काराने सन्मान झालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाने त्यांच्या नावाचा निवडणुकीपुरता वापर केला. मात्र, त्यांचे विचार त्यांनी कधीही आचरणात आणले नाहीत. यशवंतरावांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. त्यामुळे त्यांचा 'भारतरत्न' या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान झाला पाहिजे. यासंदर्भातील मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कराड येथील सभेवेळी करणार असल्याचे सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खा. उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान, काँगे्रस नेत्यांच्या अपघाती निधनाच्या मालिकेचा योगायोग होता का? असा प्रश्न उपस्थित करून उदयनराजेंनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली.

जलमंदिर या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना खा. उदयनराजे भोसले म्हणाले, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या रूपाने राज्यासह देशाला नेतृत्व मिळाले. यशवंत विचारांचा उल्लेख केला जातो, त्यावेळी लोककल्याणकारी विचार अपेक्षित असतो. भावी पिढीसमोर स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कार्याचा, विचारांचा आदर्श उभा राहावा, यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कार देणे महत्त्वाचे आहे. अनेकांपुढे या मुद्द्यांची मी मांडणी केली. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाण यांना आतापर्यंत हा पुरस्कार का दिला गेला नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. 'आऊट ऑफ साईट, आऊट ऑफ माइंड' हे काँग्रेसला लागू होतं. यशवंतराव चव्हाण यांचा सन्मान करणं हे आम्ही कर्तव्य समजतो, असेही त्यांनी सांगितले.

स्व. यशवंतराव चव्हाण यांचा हॉस्पिटलमध्ये योग्य उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी करून खा. उदयनराजे म्हणाले, काँग्रेसने यशवंतरावांचा वापर केवळ निवडणुकांपुरताच केला. काँग्रेसमधील राजेश पायलट, माधवराव सिंधिया, वायएसआर रेड्डी यांच्या अपघाती निधनाची मालिका हा काय योगायोग होता का? काँग्रेसने नावारुपास आलेले अनेक नेते गायब केले, असा खळबळजनक आरोप उदयनराजेंनी केला.

स्व. यशवंतरावांच्या मृत्यूची चौकशी करू असे खा. शरद पवारांनी जाहीर केले होते. हे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर खा. उदयनराजे म्हणाले, काही लोकांना सोयीप्रमाणे विसर पडतो. त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. वास्तविक चौकशी व्हायला हवी पण ती का झाली नाही? संबंधित व्यक्तींना विचारलं तर ते आणखी उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले.

मुंबई बाजार समितीच्या शेतकर्‍यांसाठी तुम्ही काय भूमिका घेणार?, असे विचारले असता खा. उदयनराजे म्हणाले, बाजार समिती घोटाळ्याचं प्रकरण 2013-14 साली घडलं. त्यावेळी सत्ता कुणाची होती? हे प्रकरण तेव्हापासून दाबून ठेवण्यात आलं असं म्हणावं लागेल. तुम्ही घोटाळा, गैरव्यवहार केला नसेल तर तुम्ही हायकोर्टात गेला कशाला? लोकांना भेटायचं आहे. लोकांशी संवाद साधायचा आहे. मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जामीन मिळावा, अशी मागणी कोर्टात का केली? बाजार समितीत गैरव्यवहार झाला असून त्यांच्यावर अ‍ॅक्शन घेण्यात यावी, असे कोर्टाचेच निर्देश आहेत. संबंधित अधिकार्‍यांनी कारवाई न केल्यास कोर्टाचा अवमान होईल याला मी काय करु? हे प्रकरण मी उकरुन काढलेलं नसल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. शशिकांत शिंदे यांच्या चौकशीसाठीच्या व्हायरल मॅसेजसंदर्भात छेडले असता उदयनराजे म्हणाले, मॅसेज आणि निवडणुकीचा काहीही संबंध नाही. अटक करावी अशी माझी मागणी नाही. कोर्टाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे अ‍ॅक्शन घेतली जाईल किंवा नाही हे वेळ ठरवेल. कागदपत्र पाहिले तर घोटाळ्यात त्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट होते. त्यांचं त्यादृष्टीने स्टेटस पाहिलं तर 'फरार' असा आहे. त्यांना अंतरिम जामीन आहे. त्यांच्याशी काहीही देणेघेणे नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news