

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापुरातील लोकसभेची निवडणूक पुरोगामी विरुद्ध हिंदुत्ववादी अशी होणार नाही. या निवडणुकीत आपली उमेदवारी निश्चित आहे, असे सांगून खा. संजय मंडलिक यांनी केवळ लोकसभेची आणि कोल्हापूर मतदारसंघाचीच का सर्वच निवडणुका बिनविरोध करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही बिनविरोध पंतप्रधान करा, असा पलटवार केला. कोरोची येथे माध्यमांशी ते बोलत होते.
गेल्या लेाकसभेच्या निवडणुकीत 18 खासदार शिवसेनेचे निवडून आले आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर 18 पैकी 13 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत. पाठिंबा देताना विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी देण्याची चर्चा झाली होती. त्यामुळे विद्यमान खासदारांना पुन्हा उमेदवारी मिळणार यात शंका नाही. गेल्या निवडणुकीत सुमारे पावणेतीन लाख मतांनी आपण विजयी झालो आहे. निवडून आल्यानंतर मतदारसंघात कोट्यवधीची कामे केली आहे. त्यामुळे कोल्हापूर लोकसभा मतदासंघातून महायुतीतर्फे आपल्यालाच उमेदवारी मिळणार आणि विजयीदेखील होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
शाहू महाराज यांच्याबद्दल आदर असेल तर त्यांना बिनविरोध निवडून द्यावे, असे वक्तव्य आ. सतेज पाटील यांनी केले आहे. याबद्दल विचारले असता खा. मंडलिक यांनी कोणकोणत्या निवडणुका बिनविरोध करायच्या याची यादी सतेज पाटील यांनी द्यावी, असा टोला लगावला.