जागतिक मातृदिन : पक्ष्यांमधील मातेलाही असते तळमळ…
सुनील जगताप
पुणे : मातृदिन हा उत्सव आईचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. तसेच हा कुटुंबातील किंवा व्यक्तीच्या आईचा तसेच मातृत्व, मातृबंध आणि समाजातील मातांचा प्रभाव यांचा सन्मान करणारा उत्सव आहे. अशीच मातृत्वाची भावना आपल्याला पक्ष्यांमध्येही पाहायला मिळतेच, पण अनेक पक्ष्यांमधील उत्कट भावना पाहून माणसानेही त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचेच स्पष्ट होते.
धनेश (हॉर्नबिल) या पक्ष्याचे घरटे बनविण्याची पद्धत आणि कुटुंबाभिमुखता ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे.
मोठ्या, उंच आणि जुन्या झाडांच्या ढोलीत धनेश घरटे करतो. तसेच मानव ज्या पद्धतीने कुटुंबात राहतो, तसेच धनेश पक्षी कुटुंबात राहण्यास प्राधान्य देतो. धनेश पक्ष्याला प्रजनन करण्यासाठी जानेवारी ते एप्रिल हा कालखंड अनुकूल असतो. या काळात आपल्या पिलांची पूर्ण वाढ होईपर्यंत आई धनेश चक्क तीन महिने कारावास स्वीकारते. ती या काळात अंडी घालून पिल्ले मोठी होईपर्यंत ढोलीच्या आतच बसते. पिल्ले उडण्यास सक्षम होण्याच्या थोडे आधी ती घरट्यातून बाहेर येते. या दरम्यान, बाबा धनेश पक्षी आई व पिल्लांना खाद्य भरवत असतो. पिल्लांसाठी आपल्या स्वातंत्र्याचा त्याग करणारी दुसरी आई पाहायला मिळणार नाही.
बाबा होतात आई…
काही पक्षी असे असतात की, जिथे आई अंडी घालते व बाबा ती उबवून पिल्लांचे संगोपन करीत असतात. कमळ पक्षी तसेच, तुतवार व फॅलॅरोप कुळातील पक्षी या प्रकारे प्रजनन करतात.
आई-बाबा दोघेही असतात पालक…
बहुतेक पक्ष्यांमध्ये आई व बाबा दोघेही आपल्या पिलांचे संगोपन व संरक्षण करतात. अशा वेळेला पिल्लांची वाढ होत असताना फक्त आईवर ताण पडत नाही. अशा पक्ष्यांमध्ये पिल्ले जगण्याची शक्यता खूप जास्त असते.
परक्या मुलांची होते आई…
कोकिळ कुळातील पक्षी आपली अंडी कावळा, सातभाई, शिंपी, शिंजिर (सूर्यपक्षी) अशा पक्षांच्या घरट्यात टाकून स्वतः मात्र पसार होतात. अशा अंड्यांचे काळजीपूर्वक संगोपन आणि पिल्लांना अन्न भरविण्याचे काम या पक्ष्यांची आई करते. शिंजिरासारखा इवलासा पक्षी-आई आपल्यापेक्षा चौपट आकाराच्या कोकिळेच्या पिलाला जेव्हा भरवते तेव्हा तिची किती त्रेधातिरपिट उडत असेल बरे.
परक्या मुलांची होते आई…
कोकिळ कुळातील पक्षी आपली अंडी कावळा, सातभाई, शिंपी, शिंजिर (सूर्यपक्षी) अशा पक्षांच्या घरट्यात टाकून स्वतः मात्र पसार होतात. अशा अंड्यांचे काळजीपूर्वक संगोपन आणि पिल्लांना अन्न भरविण्याचे काम या पक्ष्यांची आई करते. शिंजिरासारखा इवलासा पक्षी-आई आपल्यापेक्षा चौपट आकाराच्या कोकिळेच्या पिलाला जेव्हा भरवते तेव्हा तिची किती त्रेधातिरपिट उडत असेल बरे.
भिन्न आई… भिन्न आहार…
काही पक्ष्यांमध्ये आई पिल्लांना मध भरवते. इतर पक्ष्यांच्या मातोश्री फळं, धान्य, कीटक, सरडे, पाली, बेडूक, साप, इतर पक्षी व गरुडांसारखी आई तर ससे, घोरपडी असे मोठे प्राणीदेखील शिकार करून पकडून आणतात अन् पिल्लांना खायला घालतात.
घराबद्दल जागरूक असणारी आई
सुगरण पक्ष्यांमध्ये नर जेव्हा घर बांधतात तेव्हा ते योग्य आहे की नाही हे अतिशय काटेकोरपणे मादी पक्षी ठरवते. होणार्या पिल्लांची आई आपल्या घरट्याची निवड खूप काळजीपूर्वक करते. अशी घरटी ताडा-माडाच्या उंच झाडांवर, विहिरीवर डोकावणार्या काट्यांच्या झाडांच्या फांद्यावर असतात.
पंखांची ऊब…
टिबुकली, बदके असे जलचर पक्षी व त्यांच्या मातोश्री चक्क आपल्या पंखाच्या आत पिल्लांना घेऊन इकडे तिकडे मुक्त संचार करतात. पंखांच्या आड दडलेली पिल्ले सहज शिकारी करणार्यांना सापडत नाहीत.
मानव जातीमध्ये जसे आईला अधिक महत्त्व आहे. तसेच, पक्ष्यांच्या आईलाही तेवढेच महत्त्व आहे. धनेश (हॉर्नबिल) सारखी आई आपल्या पिल्लांसाठी कारावास सहन करीत असते. पक्ष्यांमधील मातृत्वाचे विविध भाव, त्याचे पैलू आपल्याला बघायला मिळत असतात.
– डॉ. सतीश पांडे, पक्षीतज्ज्ञ
पक्ष्यांमधील मातृत्वातदेखील ममता, जिव्हाळा, तळमळ, वेळप्रसंगी कठोरता असे सर्व भाव बघायला मिळतात. दिसायला भेदक असणार्या शिकारी पक्ष्याची मादीही आपल्या अंड्यांची व पिलांची काळजी तितक्याच हळूवारपणे घेते. पिलांना अन्न भरवणे व वाढवणे, घरट्याची रक्षा यात मादीचा समान वाटा असतो.काही प्रजातीच्या पक्ष्यांमध्ये 'परजीवी मातृत्व' बघायला मिळते. कोकीळ प्रजातीचे पक्षी कावळा, सातभाई, सुभग अशा पक्ष्यांच्या घरट्यात स्वतःची अंडी घालतात, परंतु ते कोकिळेच्या पिलांना आपली पिले म्हणून वाढवतात.
– स्वप्निल थत्ते, पक्षी तज्ज्ञ

