

जगभरात काही नोकर्या अतिशय अनोख्या आणि सुखाच्या म्हणाव्यात अशा आहेत. त्यामध्ये तुम्हाला आराम अधिक आणि काम कमी असते. काही ठिकाणी कामही असे असते की 'पाचही बोटं तुपात' अशी नोकरदाराची स्थिती होते. अशाच काही नोकर्यांची ही माहिती…
काही न करणे : अनेक लोक 'खून-पसिना' एक करून कष्ट करीत असतात व चार पैसे मिळवतात. अशावेळी जपानमधील एक माणूस काहीही काम न करता पगार घेतो. तेथील काही लोक त्याला काहीही न करण्यासाठीच भाड्याने घेतात. हा माणूस त्यांच्यासमवेत केवळ वेळ घालवतो, हिंडतो-फिरतो, जेवतो आणि त्यांचे बोलणे ऐकतो. केवळ एवढ्यासाठी त्याला चांगले पैसे मिळतात.
आलिंगन : एखाद्या व्यक्तीला आलिंगन देण्याचीही नोकरी असू शकते याची आपण कल्पनाही करणार नाही. मात्र, अशी एक नोकरी आहे आणि ऑस्ट्रेलियातील एक महिला त्यासाठी चांगला पगारही घेते. मिसी रॉबिन्सन असे या महिलेचे नाव आहे. ती व्यवसायाने एक मेंटल हेल्थ अॅक्टिविस्ट आणि लायसन्स कडल थेरेपिस्ट आहे. ती लोकांना उपचाराचा एक भाग म्हणून 'जादू की झप्पी' देत असते. त्यासाठी तिला दीड लाख रुपयांपेक्षाही अधिक पैसे मिळतात.
झोपणे : सुट्टीच्या दिवशी दुपारी मस्त ताणून देणे कुणाला आवडत नाही? मात्र झोपण्याचीच नोकरी मिळाली तर? एक लक्झरी बेड कंपनी आपल्या गाद्या व फर्निचरच्या तपासणीसाठी लोकांना भाड्याने घेते. या लोकांना दिवसातून सहा तास अशा बेडवर झोपावे लागते. त्यांच्यासाठी टी.व्ही.चीही व्यवस्था केलेली असते. लोकांनी केवळ बेडवर झोपणे आणि टी.व्ही. पाहणे इतकेच काम करायचे असते. अर्थातच या बेडवर झोपून कसे वाटते हे त्यांना सांगायचे असते. त्यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली जाते.
आईस्क्रीम टेस्टर : ही नोकरी जगातील सर्वात चांगल्या नोकर्यांपैकी एक आहे. मात्र, त्यासाठीही काही पात्रता लागते. आईस्क्रीम टेस्टरला स्वादाचे चांगले ज्ञान असावे लागते. कंपनीत तयार होणारे प्रत्येक प्रकारचे आईस्क्रीम चाखून त्याचा दर्जा कसा आहे हे सांगण्याचे काम असे लोक करतात. आईस्क्रीममध्ये सर्व सामग्री नीट आहे का, ते व्यवस्थित बनले आहे का तसेच त्याचा स्वाद चांगला आहे का हे असे लोक सांगतात जेणेकरून ग्राहकांना आईस्क्रीम पसंत पडेल. अशा आईस्क्रीम टेस्टरला वर्षाला 28 ते 78 लाख रुपयांचाही पगार दिला जातो!
फूड स्टायलिस्ट : आपण अनेक प्रकारच्या जाहिरातींमध्ये चांगले वाटणारे खाद्यपदार्थ जरूर पाहिले असतील. त्यांना पाहून आपल्या तोंडात पाणीही आले असेल. हा सुद्धा एका नोकरीचा भाग आहे. महागड्या रेस्टॉरंटसाठी खाद्यपदार्थांना स्वादिष्ट दाखवणे हे फूड स्टायलिस्टचे काम असते. या पदार्थांची सजावट चांगली केल्यावर लोक त्याकडे आकर्षित होत असतात. अशा फूड स्टायलिस्टना वर्षाला 19 लाख ते 75 लाख रुपयांचे वेतन मिळते.