पिंपरी : मोशी डेपोतील कचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पाचे काम संथ गतीने

पिंपरी : मोशी डेपोतील कचरा विल्हेवाटीच्या प्रकल्पाचे काम संथ गतीने
Published on
Updated on

पिंपरी, पुढारी वृत्तसेवा: पिंपरी-चिंचवड शहरातील कचरा मोशी डेपोत जमा केला जातो. त्या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधींचा खर्च केला जात आहे. मात्र, त्या प्रकल्पांची कामे संथ गतीने सुरू असल्याने कचर्‍याचे ढीग कमी होत नसल्याचे चित्र आहे. परिणामी, परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे.

कचर्‍यापासून वीज निर्मिती करण्याचा वेस्ट टू एनर्जी प्रकल्प राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या सत्ता काळात आणला. सत्ताधारी भाजपच्या सत्ताकाळात 20 एप्रिल 2018 ला त्या प्रकल्पास सर्वसाधारण सभेची मंजुरी मिळाली. 'डिझाईन, बिल्ट, ऑपरेट अ‍ॅण्ड ट्रान्सपोर्ट (डीबीओटी) या तत्वावर तो प्रकल्प मोशी डेपोत उभा केला जात आहे. तो प्रकल्प अ‍ॅन्टोनी लारा एन्व्हायरो' व 'एजी एन्व्हायरो' या ठेकेदार कंपन्या चालविणार आहेत. शहरातून दररोज एकूण 1 हजार 200 मेट्रिक टन कचरा जमा होतो. तो डेपोत आणून टाकला जातो. त्यातील 600 ते 700 मेट्रिक टन सुक्या कचर्‍यापासून वीज निर्माण केली जाणार आहे. ती वीज पालिका विकत घेणार आहे. त्यामुळे तो प्रकल्प उपयुक्त असल्याचा दावा प्रशासनासह सत्ताधार्‍यांनी वारंवार केला जात आहे.

या प्रकल्पाचा खर्च 208 कोटी असून, त्याची देखभाल, दुरूस्ती व संचालन ठेकेदार 21 वर्षे करणार आहे. प्रकल्पासाठी महापालिकेने ठेकेदाराला 50 कोटींचा निधी दिला आहे. पहिल्या टप्प्यातील मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटीचे (एआरएफ) काम सुरू आहे. तेथे ओला व सुका कचरा वेगळा केला जात आहे. सर्वसाधारण सभेने मंजुरी देऊन साडेचार वर्षे झाली तरी, अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे कचर्‍यापासून अद्याप एक युनिटही वीज महापालिकेस मिळालेली नाही.

दरम्यान हा प्रकल्प नोव्हेंबर 2022 मध्ये सुरू होणार असल्याचा दावा पर्यावरण विभागाच्या आधिकार्‍यांनी फेब्रुवारी 2022 महिन्यामध्ये केला होता. मात्र, आता अधिकार्‍यांकडून पुन्हा नवीन वर्षाचा मुहूर्त सांगितला जात आहे. मोशी डेपोत अनेक वर्षांपासून साचलेले कचर्‍याचे ढीग बायोमायनिंग करून हटवण्यात येणार असल्याचा दावा पर्यावरण विभागाने केला होता. त्या कामास फेब्रुवारी 2022 ला मंजुरी मिळाली होती.

मात्र, आतापर्यंत गेल्या सात महिन्यात अवघ्या 2 लाख क्युबिक मीटर कचर्‍याचे बायोमायनिंग करून हटविण्यात आला आहे. तर तब्बल 6 लाख क्युबिक मीटर कचर्‍याचे डोंगर अद्याप कायम आहे. हिंद ग्रो अ‍ॅण्ड केमिकल्स कंपनीला दिलेल्या 43 कोटी 80 लाखांच्या कामावर लक्ष नसल्याने काम संथ गतीने सुरू आहे. पावसाळ्यात कचरा ओला असल्याने तो मशिनमध्ये जात नसल्याने काम त्या काळात बंद असल्याचा दावा पर्यावरण विभागाच्या अधिकार्‍यांनी केला.

जानेवारीत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प सुरू करणार

शहरात दररोज 1 हजार 200 मेट्रीक टन कचरा जमा होतो. 'वेस्ट टू एनर्जी' प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्थापत्य कामे पूर्ण झाली आहे. इतर कामे सुरू आहेत. प्रकल्प जानेवारी 2023 मध्ये सुरू होईल. बायोेमायनिंगचे ही काम सुरू आहे. पावसाळ्यामध्ये कचरा ओला झाला असल्याने तो मशिनमध्ये जात नव्हता. त्यामुळे काम बंद होते. पहिल्या टप्यात 2 लाख क्युबिक कचरा हटविण्यात आला आहे, असे सहशहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news