

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : राज्यात गेल्या १६ वर्षांमध्ये केवळ ८ केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आल्याची बाब माहिती अधिकारातून समोर आली आहे. या आकडेवारीनूसार महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी २ केंद्रीय विद्यालये उभारण्यात आल्याचे स्पष्ट होते.
विशेष म्हणजे पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वातील यूपीएच्या कार्यकाळात महाराष्ट्रात सर्वाधिक ५ केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आली, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीएच्या कार्यकाळात गेल्या ८ वर्षात राज्यात ३ केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आल्याची माहिती आरटीआय मधून समोर आली आहे.
विद्यमान एनडीए सरकारच्या कार्यकाळात मध्य प्रदेशात सर्वाधिक २० केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आले. मध्य प्रदेश पाठोपाठ उत्तर प्रदेश १७, राजस्थान १४, कर्नाटक १३, छत्तीसगढ तसेच ओडिशात प्रत्येकी १० शाळा सुरू करण्यात आल्या. तर, यूपीए सरकारच्या सुरूवातीच्या ८ वर्षांच्या कार्यकाळात ओडिशात सर्वाधिक २४ केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आले. ओडिशा पाठोपाठ मध्य प्रदेश २०, बिहार १६, उत्तर प्रदेश १२, राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी ११ आणि पंजाब व तामिळनाडूत प्रत्येकी १० विद्यालये सुरू करण्यात आले, हे विशेष.
२०१४-१५ ते २०२१-२२ दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात वार्षिक सरासरी २० प्रमाणे १५९ केंद्रीय विद्यालये सुरू करण्यात आले. तर, २००४-०५ ते २०११-१२ पर्यंत पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या सुरूवातीच्या आठ वर्षांच्या कार्यकाळात २०२ शाळा सुरू करण्यात आल्या. हे प्रमाण दरवर्षी सरासरी २५ एवढे आहे.
१ एप्रिल २०२२ पर्यंतच्या आकडेवारीनूसार काठमांडू, मॉस्के, तेहरान मध्ये कार्यरत तीन केंद्रीय विद्यालयांसह एकूण १ हजार २४९ केंद्रीय विद्यालयांमध्ये १४ लाख ३५ हजार ५६२ विद्यार्थी शिक्षण घेत असल्याची माहिती आरटीआयमधून देण्यात आली आहे.
हे ही वाचलं का ?