

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या 'इंट्यूटिव्ह मशिन्स' या खासगी कंपनीचे मून लँडर ओडिसियस' चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीरीत्या उतरले. गेल्या काही वर्षांत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील बड्या देशांनी चंद्रावर लक्ष केंद्रीत केले आहे. चीन, भारत, जपान यासारख्या देशांनी चंद्रावर यशस्वीरीत्या लँडर उतरवले आहेत आणि त्या देशांच्या रोव्हरनी चंद्रावर मुक्त संचारही केला आहे. आता त्यामध्ये अमेरिकेतील एका खासगी कंपनीच्या मून लँडरचीही भर पडली आहे.
भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे 4 वाजून 53 मिनिटांनी 'ओडिसियस' लँडर हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अलगदपणे उतरले. त्याला 'आयएम-1' या नावानेही ओळखले जाते. यापूर्वी खासगी कंपन्यांचे अंतराळयान चंद्रावर उतरवण्याचे प्रयत्न अपयशी ठरले होते. 'ओडिसियस लुनार लँडर'चे एकूण वजन 1900 किलो आहे. 15 फेब्रुवारीला त्याचे एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स' कंपनीच्या 'फाल्कन-9' रॉकेटच्या सहाय्याने प्रक्षेपण करण्यात आले होते. 21 फेब्रुवारीला हे लँडर चंद्राच्या कक्षेत पोहोचले होते.
'आयएम-1' हे सहा पायांचे असून 4.3 मीटर उंचीचे षटकोनी आकाराचे आहे. याचा आकार एका छोट्या 'एसयूव्ही' एवढा आहे. 19 डिसेंबर 1972 ला अमेरिकेच्या अपोलो 17 मोहिमेच्या माध्यमातून अमेरिकेचे शेवटचे दोन अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. अपोलो मोहिमेंतर्गत अमेरिकेचे एकूण 12 अंतराळवीर हे चंद्रावर उतरले होते. तेव्हाच्या चांद्र स्पर्धेत सोव्हिएत रशियावर अमेरिकेने विजय मिळवला होता. यानंतर थेट चंद्राभोवती विविध यानं जरी अमेरिकेने पाठवली असली तरी प्रत्यक्ष चंद्रावर उतरणारी कोणतीही मोहीम आखली नव्हती. आता 'आर्टेमिस' मोहिमेच्या माध चंद्रावर मुक्काम करण्याची मोहीम अमेरिकेच्या 'नासा'ने हाती घेतली आहे.
2025 नंतर अमेरिकेचे अंतराळवीर चंद्रावर पुन्हा उतरत काही दिवस मुक्कामही करणार आहेत. ही अर्थात अत्यंत खर्चिक मोहीम असणार आहे. या मोहिमेसाठी विविध कंपन्यांची मदत 'नासा' घेत आहे, चांद्र मोहिमांकरिता त्यांना आर्थिक आणि तांत्रिक सहाय्य करत आहे. याचाच एक भाग म्हणून 'इंट्युटिव्ह मशिन्स' ंकंपनीचे यान चंद्रावर उतरले आहे. पुढील 14 दिवस ते कार्यरत असेल आणि चंद्रावरील विविध माहिती यानावरील संवेदकांद्वारे गोळा केली जाणार आहे. अमेरिकेतील भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी या कंपनीची मदत घेतली जाणार आहे.