

पुढारी ऑनलाईन : मान्सून पुढील दोन, तीन दिवसांत मालदीव बेटे, बंगालच्या उपसागरातील काही भाग आणि दक्षिण अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे, अशी माहिती पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे. (Monsoon Update)
मान्सून १९ मे रोजी अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झाला होता. पण पुढे त्याची वाटचाल मंदावली होती. गेल्या काही दिवसांपासून अंदमानातच तो स्थिरावला होता. आता तो (monsoon update) नैऋत्य दिशेला बंगालच्या उपसागराकडे सरकला आहे.
मान्सून केरळमध्ये ४ जून रोजी दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, आग्नेय अरबी समुद्रावर एक वातावरणीय कुंड तयार झाले आहे. यामुळे केरळमधील काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. केरळमधील इडुक्की जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवारी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (monsoon rains)
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मान्सून २२ ते २६ मे दरम्यान अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे बंगालच्या उपसागरात सरकायला हवा होता. पण ही परिस्थिती ३१ मे रोजी तयार झाली. अंदमानातून मान्सूनची वाटचाल मंद गतीने झाल्याने तो केरळमध्ये उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सून कर्नाटक, आंध्र प्रदेशमध्ये ५ जूनला पोहोचण्याचा अंदाज आहे. १० जूनपर्यंत तो महाराष्ट्रात पोहोचेल. १५ जूनपासून गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशच्या बहुतांश भागात मान्सूनचा पाऊस सुरू होईल. २० जूनपासून राजस्थान, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, हिमाचल आणि जम्मू-काश्मीरपर्यंत मान्सून व्यापेल. मान्सूनचा हा टप्पा ८ जुलैपर्यंत सुरू राहणार आहे.
हे ही वाचा :