

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काश्मीर खोऱ्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांना फंडिंग करणाऱ्या मोहम्मद यासीन नावाच्या हवाला ऑपरेटरला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांच्या विशेष शाखेने तुर्कमान गेट परिसरात ही कारवाई केली. यासीनचे कुख्यात दहशतवादी संघटना लष्कर ए तोएबासोबत संबंध असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
लष्कर ए तोएबा आणि अल बद्र या दहशतवादी संघटनांच्या दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करण्याचे काम मोहम्मद यासीन करीत होता. अलिकडेच त्याने दहशतवादी कारवायांसाठी दहा लाख रुपयांचा पुरवठा केला होता. काश्मीरमधील अब्दूल मीर नावाच्या दहशतवाद्याला यासीनने 17 ऑगस्ट रोजी दहा लाख रुपये पाठविले होते. यासंदर्भात जम्मू काश्मीर पोलिसांनी मीर याला जम्मू बसस्थानकातून रंगेहाथ पकडले होते. त्याने दिलेल्या माहितीनुसार दिल्ली पोलिसांनी यासिनला ताब्यात घेतले आहे.