

किचन अत्याधुनिक बनविण्यासाठी अलीकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. अर्थात, त्यासाठी थोडे पैसे खर्च करण्याची तयारी हवी. काळानुसार आपले किचन अपडेट ठेवायचे असल्यास बाजारातील काही अत्याधुनिक वस्तू किचनमध्ये असायलाच हव्यात.
मॉड्युलर किचन कॅबिनेट : किचनमधील जागा अधिक चांगली आणि आकर्षक दिसण्यासाठी मॉड्युलर किचन कॅबिनेट फारच उपयुक्त ठरते. यामुळे किचन फार गजबजलेले दिसत नाही; पण वस्तू व्यवस्थित ठेवण्यासाठी अधिक कप्प्यांची आणि मांडण्यांची गरजही यामुळे उरत नाही.
कनव्हेक्शन मायक्रोवेव्ह ः या मायक्रोवेव्हमुळे भरपूर वेळ वाचतो आणि अन्न गरम करण्याचा बरचसा भागही वाचतो. आणि ज्यावेळी आपली इच्छा होईल त्यावेळी आपण सहजपणे त्याचा वापरही करू शकतो. अलीकडच्या काळात अनेक भारतीय पदार्थ मायक्रोवेव्हमध्ये करता येणे शक्य आहे. शिवाय मायक्रोवेव्ह करण्याजोेग्या काही खास पद्धतीसुद्धा आहेत. शिवाय यामध्ये कमीत कमी तेलाचा वापर करून आपण पदार्थ बनवू शकतो.
डबल डोअर रेफ्रिजरेटर : ही प्रत्येक घराची गरजच म्हटली पाहिजे. यामध्ये भरपूर जागा असते. त्यामुळे वारंवार बाजारात जाऊन अत्यावश्यक, पण नाशवंत वस्तूंची खरेदी करण्यात अधिक वेळ जात नाही.
नाईफ सेट : घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चाकू, फोर्क, चमचे, डायनिंग टेबलवर असणे आवश्यक असते. प्रत्येक पदार्थ कापण्यासाठी योग्य चाकूची गरज असते. त्यामुळे उत्तम गुणवत्तेचे शेल्फ्स नाईफ केव्हाही उपयुक्त ठरतात. बाजारामध्ये अशा चाकूंचे आकर्षक सेट उपलब्ध आहेत. त्यापैकी चांगल्या सेटची निवड करून उपयुक्तेबरोबरच किचनची शोभाही वाढवावी.
कटिंग बोर्ड ः किचनसाठी शक्यतो प्लास्टिक कटिंग बोर्ड घेऊ नये. भाज्या कापण्यासाठी वूडन कटिंग बोर्ड केव्हाही अधिक उपयोगी ठरू शकतो.
वाईन ग्लास सेट ः कँडल लाईट डिनरसाठी वाईन ग्लास सेट उपयोगाचा ठरतो. त्यामुळे आपल्या आवडीच्या सेटची निवड करावी आणि त्यासाठी एक खास जागा बनवावी. घरात या ग्लासची गरज नसेल तरीही असे ग्लास आणून ठेवावेत; कारण यामुळे किचनचे ग्लॅमर वाढते. तसेच यातून वाईन अथवा मद्यच प्यायले पाहिजे, असे नसते. सरबत, मिल्क शेक आदींसाठी त्याचा वापर करता येतो.
क्रॉकरी ः क्रॉकरी घेताना तडजोड करू नये. उत्तम दर्जाची, बोन चायनाची डिसेंट क्रॉकरी घ्यावी आणि ती ठेवण्यासाठी योग्य जागा बनवावी. क्रॉकरीमुळे डायनिंगचा मूड एकदम चेंज होतो.
फूड प्रोसेसर ः फूड प्रोसेसरमुळे कुकिंग प्रोसेसला अधिक वेग मिळतो. फूड प्रोसेसर घरी असल्यास मास्टर शेफ बनायला वेळ लागत नाही. यामुळे भाज्या चिरणे, किसने ही कामे अगदी कमी वेळेत होतात. त्यामुळे ऊर्जा आणि वेळ दोन्हीची बचत होते.
उत्तम कटलरी ः कटलरी हे किचनमधील अॅक्सेसरीज असतात. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात उच्च दर्जाची कटलरी असल्याचे दिसते. त्यात आकारामध्येही वैविध्यता दिसते. त्यामुळे योग्य त्या पर्यायाची निवड करून आपल्या किचनला साजेशा अशी कटलरी घ्यावी.