काय ती बारामती, काय ते कृषिप्रदर्शन ! काय पवारांचे नियोजन, माझा शेतकरी एकदम ओक्के, शहाजीबापू पाटील यांची फटकेबाजी

काय ती बारामती, काय ते कृषिप्रदर्शन ! काय पवारांचे नियोजन, माझा शेतकरी एकदम ओक्के, शहाजीबापू पाटील यांची फटकेबाजी
Published on
Updated on

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामतीत ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित अटल इन्क्युबेशन सेंटर व कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक या कृषी प्रदर्शनाची सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी भेट देत पाहणी केली. काय झाडी, काय डोंगरच्या धर्तीवर त्यांनी काय बारामती, काय ते कृषिप्रदर्शन आणि काय ते राजेंद्र पवार यांचे नियोजन, माझा शेतकरी एकदम ओक्के या शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. संस्थेचे चेअरमन राजेंद्र पवार यांच्या समवेत प्रदर्शनाची पाहणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

पाटील म्हणाले, बारामतीला मी पहिल्यांदा १९७१ ला आलो होतो. पंढरपूरचे आमदार औदुंबर पाटील हे आमचे नातेवाईक. मी तिथे हायस्कूलला शिकत असताना त्यांनी मला चल येतो का बारामतीला, असे म्हटल्यावर मी बारामतीत आलो. त्यावेळी मी पहिल्यांदा ज्येष्ठ नेते शरद पवार, पद्मश्री अप्पासाहेब पवार यांना पाहिले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणाने सातत्याने बारामतीशी संपर्क येत गेला. मी काॅंग्रेस चळवळीत पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. सन २०१३ ला शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख व पवार यांची आघाडी झाल्यावर मला शिवसेनेकडे जाण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिला नाही. परंतु तिकडे गेलो तरी माझ्या व पवार कुटुंबीयांमध्ये कधीही कटूता आली नाही, येणार नाही.

हे प्रदर्शन पाहिल्यावर मी माझ्या भागात काय करू शकतो, याचा विचार केला. साधारणपणे दुधाच्या संदर्भाने येथील काम पाहून सांगोल्यात चांगले काम करता येईल. फळबागा, तरकारीच्या बाबतीत आमच्या तालुक्याला आकर्षण आहे. त्यासाठी राजेंद्र पवार यांचे मार्गदर्शन घेऊन सांगोल्यात शेतीचे चांगले प्रयोग राबवू शकतो.

मी एक शेतकऱ्याचा मुलगा. लहानपणापासून रानात वाढलो आहे. आज हे प्रदर्शन पाहिल्यानंतर संपूर्ण जगातील शेतीचे ज्ञान, उत्पादन, वाण कसे बदलत चालले आहे. पिकांचे, फुलांचे सौंदर्य, टिकावूपणा कसे बदलत चालले आहे. हे सर्वच या ठिकाणी बघायला मिळाले. राज्यातील शेतकऱ्यांना इतर ठिकाणी हे बघायला मिळणे अशक्यप्राय आहे. माझ्यासारख्यालासुद्धा इतरत्र बघायला मिळत नाही अशा शब्दात त्यांनी प्रदर्शनाचे कौतुक केले.

पक्षाशी प्रामाणिक राहून काम करायचं

मंत्रिमंडळात समावेश होईल का, या प्रश्नावर शहाजीबापू पाटील म्हणाले, मी राजकारणात बालपणापासून आहे. राजकारण ही माझी आवड आहे. १९७२च्या मंत्रिमंडळापासून जे फेरबदल राजकारणात झाले ते मी बारकाव्याने बघत आलो आहे. यादी जाहीर होऊन मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन येत नाही तोपर्यंत सगळ्यांनी स्वप्ने बघायची असतात. स्वप्ने बघायला कोणाचे बंधन नसते, त्याला पैसे लागत नाही. ज्याच्या नशिबात असेल त्याला मिळणार आहे, ज्याला मिळणार नाही, त्याने राबून काम करत राहायचं. पक्षाशी प्रामाणिक राहायचं. बारामतीत राजकीय बैठकीला बोलावले तर मला यावे लागणार, दादा खवळले तरी काय करणार ? अहो, पक्षाने सांगितल्यावर यावं लागतं नाहीतर पक्षातून काढून टाकतील की, असेही ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news