काय त्यो सांगली-कोल्हापूरचा रस्ता ‘एकदम ओक्के’ आमदार शहाजीबापू अडकले ट्रॅफिकमध्ये अन्
इचलकरंजी; पुढारी वृत्तसेवा सांगली-कोल्हापूर मार्गावरील हातकणंगलेजवळ वाहतूक कोंडी वाहनधारकांची दिवसेंदिवस डोकेदुखी ठरू लागली आहे. याचा फटका आज (शनिवार) शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनाही बसला. तब्बल अर्धा तास त्यांचा ताफा वाहतूक कोंडीत अडकला. त्यांच्या गाड्यांचा ताफा पुढे सरकत नसल्याने त्यांनाही गाडीतच डुलकी लागली. यावेळी काय तो सांगली- कोल्हापूर रस्ता काय ते खड्डे आणि ट्रॅफिक एकदम ओक्के असा संताप त्यांना पाहून वाहनधारकांनी व्यक्त केला.
काय झाडी… काय डोंगार… म्हणणाऱ्या शहाजी बापूंना कोल्हापुरात काय ते ट्रॅफिक असं म्हणण्याची वेळ आली. कोल्हापूर- सांगली मार्गावर शहाजी बापू यांचा ताफा ट्रॅफिकमध्ये अडकला. सांगली मार्गावरून कोल्हापूरला जाताना हा प्रकार घडला. यामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली.
सांगली – कोल्हापूर मार्गावरून प्रवास करायचा म्हणजे वाहनधारकांना अक्षरशा जीव मुठीत घेऊनच मार्ग काढावा लागतो. रेल्वे मार्गावर वाटेल तशी खुदाई करून रस्ते बंद झाल्यामुळे सांगली-कोल्हापूर रोडवर वाहतूक कोंडी होत आहे. हातकणंगले जवळील रामलिंग फाटा ते तारदाळ फाट्यापर्यंत रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे मंद गतीने वाहतूक सुरू असते.त्यामुळे रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
पावसामुळे आज (शनिवार) रस्त्यावर पाणी आल्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. स्कूलबस, ॲम्बुलन्स जागच्या जागी थांबून होत्या. पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गलथान कारभारावर वाहनधारकांतून तीव्र संताप व्यक्त हाेत हाेता.
हेही वाचा :

