

दीपक देवमाने :
जामखेड : राज्यात आत्तापर्यंत काका पुतण्याचे राजकारण पहिले. स्व. बाळासाहेब ठाकरे व राज ठाकरे, स्व. गोपीनाथ मुंडे व पुतणे धनंजय मुंडे, अजित पवार व आता रोहित पवार नवीन काका पुतण्याचे राजकारण तयार झाले आहेत. अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेत्यांचा गट अचानक 30 ते 35 आमदार घेऊन शिंदे फडणवीसांच्या सत्तेत सहभागी झाले.
राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाले असून, राष्ट्रवादीचे फायरब्रँड नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली अन् बंड केले. यामुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फुट पडली. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांचे निकटवर्तीयांनी त्यांना दगा दिला. अशातच शरद पवारांचे नातू अन् आमदार रोहित पवारांनी पक्षाची भूमिका भक्कमपणे मांडताना दिसत होते. यामुळे आमदार रोहित पवारांवरच आता मतदार संघासह राज्याची जबाबदारी आली. आमदार पवार हेच आता राष्ट्रवादीचा आश्वासक युवा चेहरा असल्याचे दिसते.
शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचा मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मेळावा पार पडला. यावेळी शरद पवारांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यासाठी शरद पवारांचे नातू तसेच कर्जत -जामखेड आमदार पवार उपस्थित राहत पक्षाची भूमिका ठामपणे मांडत होते. जामखेड तालुक्यातील राष्ट्रवादी सर्वच पदाधिकारी ज्येष्ठ नेते शरद पवारांबरोबर ठामपणे उभी आहेत. दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी अजित पवारांबरोबर गेलेल्या पदाधिकार्यांचा निषेध व्यक्त केला. यामुळे पवारांचे नातू आमदार रोहित पवार कर्जत जामखेडच्या पदाधिकारी पवारांच्या गटाकडे जाणार नाही याची काळजी घेतली. जामखेड तालुक्यातील एकही पदाधिकारी अजित पवारांच्या गटाकडे गेले नसल्याचे दिसते.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राष्ट्रवादीला काँग्रेसला मोठे भगदाड पाडल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी फुट पडली आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यावरच आता मतदार संघासह राज्याची जबाबदारी आली असल्याचे दिसते. आगामी काळात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असताना अजित पवारांनी राष्ट्रवादीत मोठी फुट पाडत दिग्गज नेते त्यांच्याबरोबर नेले असल्याने राष्ट्रवादीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.