

कौलव, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, स्वातंत्र्य सैनिक व सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व माजी केंद्रीय कृषिमंत्री अण्णासाहेब शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेकडून देण्यात येणारा सहकारातील राज्यस्तरीय आदर्श नेतृत्व हा पुरस्कार काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांना जाहीर झाला आहे. दि. 7 जानेवारीला या पुरस्काराचे संगमनेर (जि. अहमदनगर) येथे वितरण होणार आहे. (P.N. Patil)
आ. पाटील गेली चाळीस वर्षे काँग्रेसशी एकनिष्ठ असून, त्यांनी सलग वीस वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून, तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व केंद्रीय निरीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सलग 35 वर्षे संचालक व त्यापैकी सलग पाच वर्षे अध्यक्ष म्हणून भरीव कामगिरी केली आहे. या काळात शेतकर्यांना कर्जावरील व्याजात सवलत देण्याचा निर्णय देशात सर्वप्रथम घेतला होता. (P.N. Patil)
शाहूनगर, परिते येथील भोगावती सहकारी साखर कारखान्यावर आ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेले 30 वर्षे सत्ता आहे. कारखान्याचे अध्यक्ष म्हणून पाच वर्षे काम करताना त्यांनी कारखाना हिताची धोरणे राबवली. याचबरोबर राजीवजी सहकारी सूतगिरणी, श्रीपतराव दादा सहकारी बँक व निवृत्ती तालुका संघ या माध्यमातून सहकार क्षेत्रात भरीव काम केले. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन थोरात सेवाभावी संस्थेने पुरस्कार जाहीर केला आहे.
या पुरस्काराचे वितरण कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या कार्यक्रमात होणार आहे. यावेळी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला व कर्नाटकचे मंत्री एच. के. पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.