मिलिंद देवरा, व्ही. मुरलीधरन, बाबा सिद्दीकी, नारायण राणेंची राज्यसभेवर वर्णी लागणार

मिलिंद देवरा, व्ही. मुरलीधरन, बाबा सिद्दीकी, नारायण राणेंची राज्यसभेवर वर्णी लागणार

Published on

मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळ सदस्यांमधून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी 15 फेब्रुवारी ही उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून शिवसेना शिंदे गटाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी, भाजपकडून व्ही. मुरलीधरन आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची वर्णी पक्की मानली जात आहे. माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांचा मात्र राज्यसभेचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे; तर काँग्रेसचा उमेदवार ठरविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सोमवारी दिल्लीत जाणार असल्याचे समजते.

राज्यसभेच्या रिक्त 56 जागांसाठी 17 फेब्रुवारीला निवडणूक होत आहे. राज्यातून केंद्रीय मंत्री नारायण राणे, व्ही. मुरलीधरन, प्रकाश जावडेकर (भाजप), कुमार केतकर (काँग्रेस), अनिल देसाई (शिवसेना, ठाकरे गट), वंदना चव्हाण (राष्ट्रवादी, शरद पवार गट) हे सहा सदस्य निवृत्त होत आहेत. या रिक्त जागांसाठी 17 फेब्रुवारी रोजी निवडणूक होत असून 15 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे 3, तर शिवसेना शिंदे गट 1, राष्ट्रवादी अजित पवार गट 1 आणि महाविकास आघाडी एक सदस्य राज्यसभेवर निवडून जाऊ शकतो. महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक मते असल्याने काँग्रेसला उमेदवारी मिळू शकते. महाविकास आघाडीकडे काही अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे त्यांनी दुसरा उमेदवार दिला तर भाजपही चौथा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविण्याची शक्यता आहे.

भाजपकडून नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची पुन्हा एकदा राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर नारायण राणे यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढणार असून त्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर ही नावे चर्चेत आहेत. हा मतदारसंघ शिवसेनेला जाणार असल्याने राणेंची वर्णी राज्यसभेवर लावून त्यांची नाराजी टाळण्याचा भाजपश्रेष्ठी प्रयत्न करतील, अशी चर्चा आहे. तिसरे उमेदवार म्हणून भाजप सरचिटणीस विनोद तावडे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेना शिंदे गटाकडून माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांची वर्णी पक्की आहे. त्यांनी गेल्या महिन्यातच काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला आहे; तर काँग्रेस सोडून राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार्‍या बाबा सिद्दीकी यांनाही राज्यसभेची लॉटरी लागू शकते.

मविआकडून रघुराम राजन डार्क हॉर्स

महाविकास आघाडीत काँग्रेसकडे सर्वाधिक आमदार आहेत. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळणार आहे. त्यांचा एक सदस्य सहज निवडून जाऊ शकतो. मात्र, अजून उमेदवार ठरलेला नाही. काँग्रेस पक्षश्रेष्ठी दिल्लीतून उमेदवार निश्चित करणार आहेत. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांना काँग्रेस उमेदवारी देऊ शकते. राजन यांनी नुकतीच उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. ही भेट राजन यांच्या उमेदवारीविषयी सहमती बनविण्यासाठी होती असे समजते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news