

मंचर, पुढारी वृत्तसेवा: घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील आदिवासी विद्यार्थी आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी घोडेगाव कोटमदरा येथे मध्यवर्ती स्वयंपाकगृह लवकरच सुरू होत आहे. यातून जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना देखील मध्यान्ह भोजन देता येऊ शकते. यासाठी गटविकास अधिकारी यांनी माहिती गोळा करावी, अशा सूचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. घोडेगाव येथे असलेल्या चार जिल्ह्यांच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील विविध योजनांचा आढावा व चर्चा करण्यासाठी आयुष प्रसाद यांनी घोडेगाव येथील प्रकल्प कार्यालयात बैठक घेतली. या बैठकीस प्रकल्प अधिकारी बळवंत गायकवाड, जुन्नर, आंबेगाव, खेड व मावळचे गटविकास व गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते.
तब्बल 10 हजार मुलांना एकाचवेळी जेवण देता येऊ शकेल, असे मध्यवर्ती स्वयंपाकगृह घोडेगाव जवळील कोटेमदरा येथे बांधून पूर्ण झाले असून ते लवकरच सुरू होणार आहे. यातून जिल्हा परिषदेतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देण्याचा विचार आहे. या मध्यवर्ती स्वयंपाकगृहासाठी जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा करण्याची योजना प्रस्तावित करावी, अशी सूचना प्रसाद यांनी दिली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये प्रधानमंत्री आदर्श ग्रामविकास योजनाअतंर्गत समावेश असलेल्या पुणे जिल्ह्यातील 17 गावांचे प्रस्ताव आठ दिवसांत गटविकास अधिकारी यांनी द्यावेत, आदिम जमाती घरकुल योजनेमधून 86 घरांचा लक्षांक शिल्लक आहे. तसेच पारधी जमातीकरिता 2017-18 मधील 28 घरांचा लक्षांक शिल्लक आहे, यासाठी लवकरात लवकर जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
ठक्करबाप्पा योजनेंतर्गत सुरू असलेली कामे लवकर पूर्ण करावीत, इंगळुन येथील छोटा सिमेंट बंधारा बांधण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली असून, हे काम लवकर सुरू करावे, तसेच भोर तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा कुरूंजी व पांगारी या शाळांसाठीच्या पाणीपुरवठा योजनेच्या वर्क ऑर्डर झाल्या असून ही कामे लवकर सुरू करावीत, तसेच आंबेगावमधील गोहे व जुन्नर तालुक्यातील मुथाळणे या शाळा जलजिवन मिशनअंतर्गत गावासाठी होणा-या पाणी पुरवठा योजनेमधून जोडाव्यात, अशा सूचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.