

उंबरे, पुढारी वृत्तसेवा: राहुरी तालुक्यातील उंबरे, कोंडवड, शिलेगाव, कुक्कडवेढे शिवारामध्ये एका 40 ते 45 वर्षांचा अर्ध नग्न मनोरुग्ण पुरुषाने दहशत निर्माण केली आहे. शेतातील महिला मजूर आदी कामगारांवर हल्ला करून जेवणाचा डबा आदी वस्तू घेऊन तो उसाच्या शेतात पळून जातो. मनोरुग्ण असल्यामुळे हातात येईल, त्याने तो व्यक्तीवर हल्ला करतो. त्याच्या या दहशतीने पंचक्रोशीतील शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतामध्ये काम करण्यास कोणी तयार होत नाही. उंबरे शिवारात गणपती चारी परिसरात एका शेतामध्ये काही मजूर व मालक शेतामध्ये काम करीत असताना दुपारी जेवणाची सुटी झाल्यानंतर एक महिला जेवणाचे डबे लिंबाच्या झाडाखाली घेऊन आली असता, मनोरुग्ण अर्ध नग्न व्यक्तीने हल्ला करून डबे ओढून नेण्याचा प्रयत्न केला असता, महिलेने संरक्षणासाठी त्याच्यावर विळ्याचा वार केल्याने तो गंभीर जखमी झाला.
अशा परिस्थितीत तो उसाच्या फडात पळाला. उंबरे गावामध्ये ही वार्ता पसरली असता गावातील शेकडो नागरिक त्याच्या मागावर गेले. मात्र, तो कुठे सापडला नाही. यापूर्वी त्याने कुक्कडवेढे शिवारात शेतात काम करणार्या महिलांवर हल्ला करून त्यांचे जेवणाचे डबे पळविण्याचा प्रयत्न केला होता. उंबरे येथे डाग वस्ती परिसरामध्ये एका आदिवासी व्यक्तीच्या घरासमोरून मटणाचे पातेले पळवून नदीकाठी त्याने ताव मारला होता.
हा इसम मनोरुग्ण आहे. त्याच्या अंगावर कुठल्याही प्रकारचे वस्त्र नाही. सुरुवातीला त्याच्या अंगात अंडरवेअर होती. आता तीही राहिली नाही. या अर्धनग्न मनोरुग्णाचा शोध घेऊन त्याला दवाखान्यामध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न करावे. त्याच्याकडून मोठी जीवित हानी होण्याअगोदर त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी उंबरे पंचक्रोशीत होत आहे.