

पुढारी ऑनलाईन डेस्क : पुण्याचे पालकमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तत्कालिन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. मी बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकात अजित पवार यांनी पुण्यातील सरकारी जमीन विकण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले आहे. यावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी तत्कालिन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावे, अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांच्याविरोघात कायदेशीर मानहानीचा दावा दाखल करेल, असा इशारा दिला आहे. या संदर्भातील पोस्ट त्यांनी त्यांच्या 'X' सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून केली आहे. (Meera Borwankar On Ajit Pawar)
महाराष्ट्र राज्य महिला आयोग अध्यक्ष, राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रमुख रूपाली चाकणर यांनी पुढे म्हटले आहे की, पुस्तक प्रकाशन करताना त्याची चर्चा व्हावी. आपण प्रसिद्धी झोतात यावं, यासाठी मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर हेतुपुरस्पर खोटे आरोप केलेले आहेत. आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे मीरा बोरवणकर यांनी सादर करावेत. अन्यक्ष पक्ष त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करेल. असे चाकणकर यांनी म्हटले आहे. तसेच इतक्या दिवसांनंतर आताच मीरा बोरवणकर यांच्या या आरोपाची भाषा पाहता, यांचा बोलविता धनी कोण..? या गोष्टीची देखील चौकशी व्हावी, असे देखील रूपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले आहे. (Meera Borwankar On Ajit Pawar)
पुण्यातील पोलिस दलाच्या ताब्यातील जमीन लिलावाद्वारे विकून ती एका खासगी व्यक्तीच्या ताब्यात सोपविण्याचा पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रयत्न होता. तो आपण हाणून पाडला, असा गौप्यस्फोट पुण्याच्या तत्कालीन पोलिस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर'या पुस्तकात केला आहे. मात्र मात्र बोरवणकरांचा हा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फेटाळून लावला आहे. (Meera Borwankar On Ajit Pawar)
'मॅडम कमिशनर' या रविवारी प्रकाशित झालेल्या पुस्तकात बोरवणकरांच्या गौप्यस्फोटाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पुण्याच्या येरवडा तुरुंगाजवळील पोलिस दलाच्या ताब्यातील तीन एकराच्या मोक्याच्या जागेचा तत्कालीन 'दादा' पालकमंत्र्यांच्या वतीने लिलाव करण्यात आला होता. लिलावाप्रमाणे या जमिनीच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यास मला पालकमंत्र्यांनी सांगितले. पण, मी त्यास नकार दिल्यानंतर त्यांनी जागेचा नकाशा काचेच्या टेबलावर भिरकावला, असे बोरवणकर यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.