

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पश्चिम महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व जागा महाविकास आघाडी जिंकेल, असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केला. जागा वाटपाचा निर्णय मेरिटवर आधारित असेल, असेही त्यांनी सांगितले.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुण्यातील काँग्रेस भवन येथे पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. बैठकीला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील, आ. प्रणिती शिंदे, आ. डॉ. विश्वजित कदम, आ. संग्राम थोपटे, प्रदेश महिला अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे आदी उपस्थित होते.
संबंधित बातम्या :
आगामी लोकसभा निवडणुकीत पुणे लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणूक लढविणार, अशी चर्चा होती. तर, आता काँग्रेस पक्षाच्या नेत्या प्रियंका गांधी देखील पुण्यामधून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. प्रियंका गांधी पुणे लोकसभा निवडणूक लढणार आहेत का? असा प्रश्न पटोले यांना विचारला असता त्यांनी, आपण त्यांना पत्र पाठवून द्या, अशी मिश्किलपणे टिप्पणी केली. तर, यासंदर्भात हाय कमांड निर्णय घेईल, असे स्पष्ट केले.
सध्याच्या अत्याचारी सरकारचा खरा चेहरा लोकांपुढे आणणार आहे. शेतकर्यांवरील अन्याय, महागाई, बेरोजगारी, गरिबांवरील अन्याय यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या कथनी व करणीतील फरक जनतेच्या निदर्शनास आणून दिला जाणार आहे. राज्यातील सरकार शेतकरी, गरीब जनता, तरुण, बेरोजगार यांच्या विरोधातील आहे. हे सेल्फीश सरकार आहे. सुप्रीम कोर्टानेही सरकारचा खरा चेहरा उघडा केला आहे. काही भागांत ओला दुष्काळ, तर काही भागांत कोरडा दुष्काळ असूनही हे सरकार दुष्काळ जाहीर करीत नाही, अशी टीका पटोले यांनी केली. नांदेड व ठाणे येथील सरकारी रुग्णालयातील मृत्यूचे तांडव पाहूनही सरकारला जाग येत नाही. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा डोळा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. काँग्रेस जनतेसाठी लढत आहे. शाहू-फुले-आंबेडकर विचारांना वाचविण्याचे काम, तसेच भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यासाठी कार्यकर्त्यांनीही एकजुटीने काम करावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले.