

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्डकपला सुरुवात होत आहे. पण त्यापूर्वी सट्टेबाजीचे प्रकरण समोर आले आहे. काही दिवसांपूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवण्यात आली. त्यातील एका सामन्यावर ऑनलाइन सट्टा खेळणाऱ्या सात जणांना पोलिसांनी नुकतीच अटक केल्याचे समोर आले आहे. मुंबई- नाशिक महामार्गावरील शहापूर येथील परिवार गार्डन हॉटेलच्या एका रूममध्ये ऑनलाइन सट्टा खेळत असताना पोलिसांनी धाड टाकली आणि कारवाई केली.
अधिक माहिती अशी की, भव्य चैतन्य दवे (वय 25, रा. दहिसर) या युवकाने मुंबई-नाशिक महामार्गावरील शहापूर जवळील परिवार गार्डन हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती. हॉटेलच्या खोलीतून तो त्याच्या मोबाईलवरून विविध ओळखपत्रांच्या माध्यमातून अन्य सट्टेबाजांसोबत बेकायदेशीर ऑनलाइन सट्टा खेळत होता. याबाबत शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनंत पराड यांना माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून पोलिसांच्या पथकाने धाड टाकली आणि भव्य चैतन्य दवे याला अटक केली. (Matka Gambling)