रहस्‍यरंजन : सौंदर्याचेच शस्त्र करणारी गुप्तहेर

रहस्‍यरंजन : सौंदर्याचेच शस्त्र करणारी गुप्तहेर
Published on
Updated on

एक सौंदर्यवती, निष्णात नृत्यांगना जिच्यावर दोन देशांची गुप्तहेर असल्याचा आरोप होता, अगदी शेवटपर्यंत तिच्यावर झालेले आरोप तिने कधीच मान्य केले नाहीत. पण, हेरगिरी करून देशाला धोका दिल्याचा आरोप सिद्ध झाल्यानंतर तिला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली. मुळात माताहारी कुणासाठी काम करत होती, हे अगदी शेवटपर्यंत समजले नाही. तिचा मृत्यू आणि हेरगिरी एक रहस्य बनून राहिले.

जगभरात अनेक गुप्तहेरांनी आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी आपल्या प्राणाची बाजी लावली आहे. त्या गुप्तहेरांनी अनेक महत्त्वपूर्ण माहिती आपापल्या देशांना पुरवली. अशाच गुप्तहेरांपैकी एक होती माताहारी. माताहारी ऊर्फ मार्गारिटा गर्छुड हिचा जन्म 1876 मध्ये एका डच कुटुंबात झाला. असे म्हटले जायचे की, ती गर्भश्रीमंत होती. मोठ्या श्रीमंतीत आणि चैनीमध्ये आपले बालपण तिने घालवले. नेदरलँडमध्ये जन्मलेल्या माताहारीने जर्मन आणि फ्रान्स अशा दोन्ही देशांसाठी दुहेरी एजंट म्हणून काम केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. माताहारीला शाही थाटात राहणे आवडायचे. याचाच फायदा अनेकांनी घेतला. ती इतकी प्रसिद्ध होती की, सैन्य अधिकारी, मंत्री आणि अनेक राजेशाही मंडळींसोबत तिचे 'घनिष्ठ' संबंध होते.

पुढे नेदरलँडच्या एका शाही सैन्यातील डच लष्करी अधिकार्‍यासोबत तिचे लग्न झाले. तिचा पती इंडोनेशियात तैनात होता. तो तिला मारहाण करायचा. अखेर त्यांचं नात संपुष्टात आले आणि तिने आपल्या पतीला घटस्फोट दिला. दोघेही त्यावेळी तत्कालीन डच ईस्ट इंडीजचा द्विप जावा येथे राहात होते. घटस्फोटानंतर ती इंडोनेशियातील एका डान्स कंपनीत सहभागी झाली. आपलं नाव बदलून तिने माताहारी असे ठेवले. नेदरलँडमधून इंडोनेशियात परतल्यानंतर माताहारीने एक डान्सर म्हणून आपली ओळख निर्माण केली. एक व्यावसायिक नर्तकी म्हणून ती पॅरिसला निघून गेली. ती एक उत्तम नृत्यांगना म्हणून लोकप्रिय झाली. पहिले जागतिक युद्ध सुरू होण्यापर्यंत ती एक नर्तकी आणि स्ट्रिप डान्सर म्हणून प्रसिद्ध झाली. माताहारीचे नृत्य पाहण्यासाठी अनेक देशांतून राजेशाही लोक आणि मोठमोठे सैन्य अधिकारी येत होते. तिने याच गोष्टीचा फायदा घेतला. जर्मन आणि फ्रान्ससाठीही ती डबल एजंट म्हणून काम करू लागली.

खरं तर, ती खरोखरच गुप्तहेर म्हणून या देशांसाठी काम करायची का, असाही प्रश्न उपस्थित होतो. कारण जीव असेपर्यंत तिने हे स्वीकारले नव्हते.

नृत्यांगना असताना आपल्या खास अंदाजामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. इतकेच नव्हे, तर तिचे नृत्य पाहण्यासाठी तिकिटे लावली गेली. आपल्या मादक अदांमुळे प्रेक्षकांना तिने मंत्रमुग्ध केले. पॅरिसमध्ये आपल्या मोहक अदांनी लोकांना मोहून टाकले. अनेक सैन्यातील वरिष्ठ अधिकारी, दिग्गज लोक, राजकारणातील मंडळी आणि इतर मोठमोठ्या लोकांशी तिचे संबंध राहिले. त्यापैकी एक जर्मन राजकुमारदेखील होता, असे म्हटले जाते. माताहारीचा अर्थ 'सूर्य' असा सांगितला जातो.

तिने बालपणात भोगलेली श्रीमंती किशोरवयात राहिली नव्हती. जेव्हा तिचे लग्न अधिकारी कॅप्टन रुडॉल्फसोबत झाले, त्यानंतर या दाम्पत्याला दोन मुले झाली होती. त्यापैकी एक मुलगा होता. त्याचा मृत्यू त्याच्या आजीने त्याला विष दिल्यामुळे झाला, असे म्हटले गेले. 1906 मध्ये रुडॉल्फसोबत तिचे नाते संपुष्टात आले. त्यावेळी रुडॉल्फने तिला आर्थिक मदत किंवा उदरनिर्वाहासाठी पैसे देण्यासाठी नकार दिला होता. त्यामुळे मुलांची देखभाल ती करू शकली नाही. मुलांना तिला सोडावे लागले, असेही म्हटले जाते. त्यामुळे स्ट्रिप डान्सर म्हणून तिने आपले वलय निर्माण केले. डान्स करताना एक – एक कपडे उतरवायची ही शैली माताहारीने सुरू केल्याचे सांगितले जाते.

घनिष्ठ संबंधामुळे ती अनेक सैन्य अधिकारी, राजकारणी यांच्या जवळ होती. पण, कोणत्याच देशाने तिच्यावर विश्वास ठेवला नाही. नर्तकी ते गुप्तहेर अशी तिची प्रतिमा झाली. 50 हजार सैनिकांच्या मृत्यूला ती जबाबदार असल्याचे म्हटले गेले. असे म्हटले जाते की, माताहारी जर्मनीत गुप्तहेर म्हणून गेली असता, तिने फ्रान्सला धोका दिला. जादा पैशांच्या हव्यासापोटी महायुद्ध सुरू होताच फ्रान्सने ती जर्मनीची गुप्तहेर असल्याचे म्हटले, तर जर्मनीने ती फ्रान्सची गुप्तहेर असल्याचे म्हटले. तर फ्रान्स आणि इंग्लंड गुप्तहेर खात्याचा माताहारीवर ती जर्मनीची गुप्तहेर असल्याचा संशय होता. असेही म्हटले जाते की, दोन्ही देशांना मूर्ख बनवून ती दोन्ही देशांकडून पैसा कमवायची.

फ्रान्सच्या सरकारने तिला गुप्तहेर म्हणून काम करण्यासाठी कबूल केले, ज्याच्या बदल्यात तिला हवी तेवढी रक्कम मिळणार होती. पहिल्या महायुद्धाच्या दरम्यान माताहारीने आपल्या सौंदर्याचा शस्त्र म्हणून वापर करून फ्रान्सच्या लष्करी अधिकार्‍यांची अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मिळवली. पण म्हणतात ना, हव्यास-लोभ कधीच फळाला जात नाही. ती डबल गेम खेळत असल्याचे लवकरच एका गुप्तहेर एजन्सीकडून उघड झाले.

पहिल्या महायुद्धाच्या काळात माताहारीने फ्रान्स, नेदरलँडस् आणि स्पेन असा प्रवास केला. जेव्हा ती स्पेनला पोहोचली तेव्हा तिला अटक करण्यात आली. ती महत्त्वाच्या लष्करी अधिकार्‍यांकडून गुप्त माहिती मिळवायची आणि ती विकायची. पण हे कुणालाच ठाऊक नव्हतं की, ती कुणासाठी काम करतेय? फ्रान्सच्या गुप्तहेर विभागाला एक दिवस माताहारीवर संशय आला. फ्रान्सच्या सैन्याने स्पेनची राजधानी माद्रिदहून जर्मनीची राजधानी बर्लिनला पाठवत असलेले तिचे संदेश पकडले. ज्यामध्ये म्हटले होते की, त्यांना एच-29 कडून तंतोतंत माहिती मिळत आहे. फ्रान्सच्या लष्कराचा संशय आणखी बळावला.

दुसरीकडे, जर्मनीची माहिती ती फ्रान्सला पुरवत असल्याचा आरोप तिच्यावर लावला गेला. अशा प्रकारे माताहारीवर प्रत्येकाचा संशय बळावला. अखेरीस सन 1917 मध्ये फ्रान्सच्या सैन्याने माताहारीला १३ फेब्रुवारी, 1917 रोजी एका हॉटेलच्या खोलीतून पकडले. त्यावेळी माताहारी 41 वर्षांची होती. कोर्टाने तिला शिक्षा सुनावली होती. 15 ऑक्टोबर 1917 चा तो काळा दिवस होता. कोर्टाने तिला मृत्यूची शिक्षा दिली होती. गोळ्या झाडून तिला ठार करा, असा आदेश देण्यात आला. माताहारीवर लागलेले आरोप कधीही सिद्ध झाले नाहीत, असे म्हटले जाते. ती कुणासाठी काम करायची, हे देखील उघड झाले नाही. अखेरपर्यंत तिने कधीही कबूल केले नाही की, ती गुप्तहेर आहे. आपण एक नर्तकी असल्याचे तिचे म्हणणे होते. पण, तिच्यावर कुणी विश्वास ठेवायला तयार नव्हते.

मृत्यूपूर्वी तिच्या डोळ्यावर पांढर्‍या कापडाची पट्टी बांधण्यासाठी देण्यात आली होती. पण, माताहारीने ती पट्टी डोळ्यावर बांधण्यास नकार दिला. तिचे दोन्ही हात एका खांबाला बांधण्यास सांगितले होते. पण तिने एक हात मागे बांधण्यास नकार दिला. ती इतरांच्यापेक्षा इतकी वेगळी होती की, मृत्यूला घाबरण्याऐवजी तिने तिच्यावर गोळ्या झाडणार्‍या अधिकार्‍याला एका हाताने फ्लाईंग किस दिले. थोड्याच वेळात कमांडरने आदेश दिला आणि तिला तिच्यावर जोरदार आवाजात गोळ्या झाडल्या. तशी माताहारी खाली कोसळली. एका सुंदर नर्तकीचा करुण अंत झाला. तिचा मृत्यू आणि हेरगिरी दोन्ही रहस्ये बनून राहिली.

तिच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांमध्ये माताहारी अनेक पुस्तके आणि चित्रपटांचा विषय बनली होती. जसजशी अधिक माहिती समोर आली, तसा तिच्या गुन्ह्यांवर संशय येऊ लागला. जर्मन सरकारने 1930 मध्ये ती निर्दोष असल्याचे सांगितले. माताहारीच्या मृत्यूनंतर तिच्या परिवारातून तिचा मृतदेह घेण्यासाठी कोणीही आले नाही. माताहारीच्या सुंदर चेहर्‍याला फ्रान्सच्या एका मेडिकल लॅबमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले. पण, असं म्हटलं जातं की, तिच्या सुंदर चेहर्‍याची लॅबमधून चोरी झाली. ती सुंदर, मादक नर्तकी होती. पण, फ्रान्सच्या आरोपांनंतर केवळ धोका देणारी गुप्तहेर म्हणून ओळखली गेली. माताहारीचे चरित्रलेखक रसेल वॉरेन हाऊ यांनी 1985 मध्ये माताहारी निर्दोष असल्याचे फ्रान्स सरकारला कबूल करायला लावले!

ऋतुपर्ण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news