बृहदेश्वर मंदिराची अद्भुत कला

बृहदेश्वर मंदिराची अद्भुत कला
Published on
Updated on

बृहदेश्वर मंदिर (Brihadeeswara Temple) हे जगातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे. जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिरातील भगवान शिवाची मूर्ती नृत्य मुद्रेत आहे. अशी मूर्ती फार कमी ठिकाणी आढळते. मंदिरात असलेल्या शिवलिंगावर एक मोठी पंचमुखी नागमूर्ती फणा पसरवून बसली आहे.

भारत हा एक असा देश आहे, जिथे प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात मंदिरे पाहायला मिळतील. ही मंदिरे त्यांच्या वास्तू, इतिहास आणि रहस्यांसाठी जगभरात ओळखली जातात. या मंदिरांच्या गूढतेने शास्त्रज्ञांनाही आश्चर्यचकित केले आहे. त्यापैकी एक बृहदेश्वर मंदिर. (Brihadeeswara Temple)

Brihadeeswara Temple : अद्भुत वास्तुकला आणि नक्षीकामाचा अनोखा नमुना

तामिळनाडूतील बृहदेश्वर मंदिर जगातील अद्भुत वास्तुकला आणि नक्षीकामाचा अनोखा नमुना आहे. येथे स्थापित असलेले शिवलिंग एकाच दगडापासून बनवले गेले आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर नंदी आहे. त्याची मूर्तीही एकाच दगडापासून बनवलेली आहे. या मंदिराची वास्तुकला उत्कृष्ट आहे. येथे सूर्यप्रकाश थेट नंदीच्या मूर्तीवर पडतो. त्याचा प्रकाश थेट शिवलिंगावर पडतो आणि त्यामुळे शिवलिंगाचे भाविकांना दर्शन घेता येते. या मंदिराची संरचना आणि वास्तुकला दक्षिण शासनकर्त्यांकडून निर्मित करण्यात आलीय. मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे, सूर्य शिखरावर आल्यानंतरही मंदिराची सावली जमिनीवर पडत नाही. बृहदेश्वर मंदिर हे जगातील सर्वात उंच मंदिरांपैकी एक आहे. जगभरातील पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचे केंद्र आहे. हे मंदिर द्रविड वास्तुकलेचा उत्तम नमुना आहे. (Brihadeeswara Temple)

मंदिर बनवण्यासाठी जवळपास 1,30,000 टन ग्रेनाईटचा उपयोग

तामिळनाडू हे मंदिरांचे राज्य आहे. विविध ठिकाणी वास्तुकलेच्या अद्भुत रचना पाहायला मिळतात. बृहदेश्वर मंदिराचा इतिहास अधिक रंजक आहे. 1000 जुन्या ग्रेनाईट दगडाने बनलेले अनोखे बृहदेश्वर मंदिर आहे. हे मंदिर बनवण्यासाठी जवळपास 1,30,000 टन ग्रेनाईटचा उपयोग केला गेला आहे. मंदिरातील नंदीची मूर्ती २५  टन वजनाची आहे.

Brihadeeswara Temple : मंदिरातील मूर्ती नृत्य मुद्रेत

तंजावरमधील या बृहदेश्वर मंदिराची सर्वात खास गोष्ट अशी की, मंदिरातील मूर्ती नृत्य मुद्रेत आहे. भगवान शिवाची अशी मूर्ती फार कमी ठिकाणी आढळते. नृत्य मुद्रा धारण केलेल्या या मूर्तीला नटराज नावाने ओळखले जाते. या मंदिरात असलेल्या शिवलिंगावर एक मोठी पंचमुखी नागमूर्ती फणा पसरवून बसली आहे. या मंदिराची निर्मिती सन 1004 ते 1009 यादरम्यान राजा चोलद्वारा करण्यात आली होती. राजराजा प्रथमला या मंदिराचा निर्माणकर्ता मानले जाते.

राजेश्वर मंदिर, राजराजेश्वर मंदिर आणि पेरिया कोविल या नावानेही मंदिर प्रसिद्ध आहे. 'युनेस्को'ने या मंदिराचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश केला आहे. असेही मानले जाते की, जेव्हा राजराजा चोल-पहिला श्रीलंकेला गेला तेव्हा त्याने एक स्वप्न पाहिले, ज्यामध्ये त्याला हे मंदिर बांधण्याचा आदेश देण्यात आला होता. त्यानंतर त्याने या मंदिराच्या उभारणीचे काम सुरू केले.

द्रविड वास्तुकला शैलीतील हे मंदिर १३ मजली उंच

द्रविड वास्तुकला शैलीतील हे मंदिर 13 मजली उंच आहे. मंदिराचे घुमटाचे वजन सुमारे 80 टन आहे. हे घुमट इतक्या उंचावर कसे बांधण्यात आले, हे एक रहस्यच आहे. कारण, या मंदिराची उंची 216 फूट आहे. मंदिर 250 मीटर लांब आहे, तर त्याची रुंदी 122 मीटर आहे. मंदिरावर दोन गोपूरम बांधण्यात आली आहेत. मंदिराचा घुमट अशाप्रकारे बांधला आहे की, चारही दिशांनी सूर्यप्रकाश पडला, तरी त्याची सावली जमिनीवर पडत नाही. दुपारच्या वेळी या मंदिराच्या खालच्या भागाची सावली जमिनीवर दिसते; पण घुमटाची सावली कधीच दिसत नाही. ही आश्चर्यकारक घटना पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक, भाविक येथे येतात.

मंदिराची सुरुवात चोल राजाने केली होती. मंदिर ग्रॅनाईटच्या दगडांनी बांधलेले आहे; पण कोणताही चिकट पदार्थ, चुना, सिमेंटने या मंदिराचे बांधकाम केलेले नाही. या मंदिराला लॉक सिस्टीम आहे, जे दगड एकमेकांमध्ये फिक्स केलेले आहेत. हे ग्रॅनाईट खडक शिलाखंडाच्या स्वरूपात आढळतात. परंतु, हे दगड या परिसरात आढळत नाहीत. याचा अर्थ ते दूरवरून आणले गेले आहेत; पण ते इथवर कसे आणले गेले हे एक अद्भुतच आहे. मंदिराभोवती डोंगर, पर्वत नाही; मग हे कठीण दगड आणले कुठून? शिवाय, ग्रॅनाईट खडक इतके कठीण आहेत की, त्यांना कापण्यासाठी आणि छेदण्यासाठी विशेष उपकरणे वापरावी लागतात. त्या काळात आधुनिक साधनांशिवाय मंदिरातील खडकांवर कोरीव काम करून किती सुबक, कलात्मक शिल्पे बनवली गेली असतील, हाच आश्चर्याचा विषय आहे.

बृहदेश्वर मंदिराच्या भिंतीवर विविध प्रकारच्या देवदेवतांच्या लहान-लहान मूर्ती रंगवण्यात आल्या आहेत, त्याशिवाय या मंदिराचे शिखर काही रंगांनी रंगवलेले आहे, असे वाटते. परंतु, ते प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारे रंगवलेले नाही. तो मूळचा दगडांचा रंग आहे. प्रसिद्ध शास्त्रीय नृत्य भरतनाट्यम्च्या विविध मुद्रा या मंदिरावर कोरण्यात आल्या आहेत. याचा अर्थ नृत्यकलेला तत्कालीन शासनकर्त्यांनी वाव दिला होता. बृहदेश्वर मंदिरातील शिलालेखांनुसार, मंदिराचे मुख्य शिल्पकार कुंजर मल्लन राजराजा पेरुंथाचन होते, ज्यांचे कुटुंबीय अजूनही वास्तुकलेचे काम करतात.

मंदिरातील शिलालेखांवरून असे दिसून येते की, सम्राट राजाने बृहदेश्वर मंदिरातील दैनंदिन दिव्यांना तुपाचा अखंड पुरवठा होण्यासाठी चार हजार गायी, 7 हजार शेळ्या, 30 म्हशी आणि अडीच एकर जमीन मंदिराला दान केली होती. मंदिर व्यवस्था सुरळीत चालवण्यासाठी 192 कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. भगवान कार्तिकेय (मुरुगन स्वामी) चे मंदिर, माता पार्वती (अम्मान) चे मंदिर आणि नंदीची मूर्ती नायक राजांनी 16-17 व्या शतकात बांधली होती. मुघल शासकांनी केलेली युद्धे आणि आक्रमणांमुळे मंदिराचे नुकसान झाले. नंतर जेव्हा हिंदू राजांनी हा भाग पुन्हा जिंकला तेव्हा त्यांनी या मंदिराची डागडुजी करून घेतली आणि नंतर जीर्णोद्धारही झाला. नंतरच्या राजांनी मंदिराच्या भिंतींवर जुनी चित्रे पुन्हा रंगवून मंदिराचे सुशोभीकरण केले. हे मंदिर पायाशिवाय बांधले गेले आहे, म्हणजेच या मंदिराच्या बांधकामाच्या वेळी कोणताही पाया खोदला गेला नाही. परंतु, मंदिराचे बांधकाम थेट जमिनीच्या माथ्यावरून सुरू करण्यात आले होते, जे नंतरदेखील हजार वर्षे जसे आहे तसे उभे आहे.

तंजावरचे सर्वात जवळचे प्रमुख शहर तिरुचिरापल्ली आहे, जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वेस्टेशन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news