

वॉशिंग्टन : आपल्या द़ृष्टीत मंगळ (Mars) हा एक कोरडाठाक ग्रह आहे. मात्र, हा लाल ग्रह हिवाळ्यात अचानक बदलून जातो. मंगळ ग्रहाचा उत्तर गोलार्ध सध्या आपल्या पृथ्वीप्रमाणेच हिवाळा अनुभवत आहे. याच ठिकाणी 'नासा'चे पर्सिव्हरन्स रोव्हर आणि इंज्युनिटी हेलिकॉप्टर एका प्राचीन नदीच्या खोर्यात संशोधन करीत आहे. एरव्ही एकदम ओसाड आणि कोरडा वाटणारा हा ग्रह थंडी आणि बर्फापासून वेगळा नाही. मंगळ ग्रहाच्या ध्रुवांवर तापमान उणे 123 अंश सेल्सिअसपर्यंत घटते. मंगळावर कार्बन डायऑक्साईडचा बर्फ आढळतो. त्याला कोरडा बर्फ किंवा 'ड्राय आईस' असे म्हटले जाते. याशिवाय गोठलेले पाणीही दिसते.
हा बर्फ मंगळाच्या (Mars) पृष्ठभागावर पडतो. मात्र, तो संपूर्ण मंगळ ग्रहावर नव्हे तर केवळ ध्रुवीय प्रदेशातच पडतो. कॅलिफोर्नियाच्या पासाडेनामधील 'नासा'च्या जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीतील वैज्ञानिक सिल्वेन पिकक्स यांनी सांगितले की या ठिकाणी इतका बर्फ असतो की आपण तिथे स्किईंगही (बर्फावर घसरण्याचा खेळ) करू शकतो. मात्र, त्यासाठी आपल्याला एखाद्या विवरात जावे लागेल जिथे कडेच्या उतारावर बर्फ पडलेले असेल.
आतापर्यंत कोणत्याही रोव्हर किंवा ऑर्बिटरला मंगळावर (Mars) बर्फ पडत असताना दिसलेले नाही. कारण ही घटना ध्रुवीय प्रदेशांमध्ये केवळ रात्रीच्या वेळीच घडते. रोव्हर किंवा ऑर्बिटरमधील कॅमेरे ते पाहू शकत नाहीत. आतापर्यंत असा कोणताही रोबो बनवला गेलेला नाही जो मंगळाच्या ध्रुवांवरील खतरनाक तापमानाला सहन करू शकेल. अशा स्थितीत मंगळावरील बर्फाचा छडा कसा लागला हा प्रश्न उद्भवू शकतो.
मार्स रिकनायसन्स ऑर्बिटरवर एक इन्फ्रारेड कॅमेरा लावलेला आहे. तो माणसाला दिसू न शकणारा प्रकाश पाहू शकतो. त्यानेच मंगळ (Mars) ग्रहावर पडणार्या कार्बन डायऑक्साईडच्या बर्फाचा छडा लावला. 2008 मध्ये मंगळावर पोहोचलेल्या फिनिक्स लँडरनेही उत्तर ध्रुवापासून सुमारे 1600 किलोमीटरवर आपल्या लेसर उपकरणाच्या माध्यमातून पाण्याच्या बर्फाचा छडा लावला होता. उन्हाळ्यात कोरडा बर्फ वितळला की हा पाण्याचा बर्फ दिसून येतो. हा बर्फ मातीला चिकटलेला असतो आणि अतिशय हलका असतो. कोरडा बर्फ उन्हात वाफ होऊन जातो.
हेही वाचा :