

सलग दुसर्या आठवड्यात बाजारात अल्पशी घसरण झाली. निफ्टी 19517 वर बंद झाला. मागील आठवड्याच्या तुलनेत ही घसरण केवळ पाऊण टक्का असली तरी 20 जुलै 2023 रोजी निफ्टीने 19991.85 हा उच्चांक दाखवला होता. तिथपासून निफ्टी जवळपास अडीच टक्के घसरला आहे. बँका निफ्टी पावणे दोन टक्क्यांनी खाली येऊन 44879.50 वर बंद झाला. मात्र निफ्टीचे स्मॉल कॅप आणि मिड कॅप इंडेक्स अनुक्रमे एक आणि सव्वा टक्क्यांनी वधारले. पीई रेशोचा विचार करता, बँक निफ्टीचा पीई 17 म्हणजे निफ्टीपेक्षा खूप कमी आहे. त्यामुळे बँक निफ्टीमध्ये वरती जाण्यास खूप वाव आहे.
निफ्टी बँकमधील एसबीआय, फेडरल बँक, बँक ऑफ बरोडा हे शेअर्स अजूनही 10 च्या आतील पीई वर ट्रेड करीत आहेत. त्यांचे शुक्रवारचे बंद भाव खालीलप्रमाणे आहेत.
एसबीआय – रु. 573.30, फेडरल बँक – रु. 143.40, बँक ऑफ बरोडा – रु. 191.35.
मध्यम अवधी म्हणजे किमान तीन वर्षांचा विचार करून या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर भरघोस परतावा मिळण्याची शक्यता आहे.
इंडिया बुल्स हाऊसिंग फायनान्स, आयआरएफसी, हिंद कॉपर हे शेअर्स आठवड्यात चांगलेच वधारले. ब्लूडार्ट, रेडिंटन, पिरॅमल एंटरप्राईज, इक्विटास बँक आणि वेदांता हे शेअर्स घसरले.
महिन्याचा पहिला आठवडा हा ऑटो कंपन्यांच्या मासिक विक्रीच्या आकड्यांचा असतो. जुलै महिन्यातील ऑटो कंपन्यांच्या विक्रीचे आकडे खालीलप्रमाणे आहेत.
1) मारुती सुझुकी – जुलै महिन्यातील वाहन विक्री 1,81,630 – 3.25 टक्के YOY वाढ.
2) महेंद्र आणि महिंद्र – 66124 – 18 टक्के YOY वाढ.
3) आयशर मोटर्स 73117 – 32 टक्के YOY वाढ.
4) बजाज ऑटो – 31,29, 747 – 10 टक्के YOY घट.
5) टाटा मोटर्स – 80633 – 1.41 टक्के YOY घट.
6) हिरो मोटो – 3,91, 310 – 12.18 टक्के YOY वाढ.
हिंडेनबर्गच्या कोलाहलामुळे अडचणीत सापडलेल्या अदानी समूहाकडून मागील सप्ताहात एका समूहाच्या द़ृष्टीने सफारात्मक बातमी आली. अंबुजा सिमेंट आणि एसीसी या दोन सिमेंट कंपन्या अदानी ग्रुपने यापूर्वीच अधिग्रहीत केल्या आहेत. त्यापैकी अंबुजा सिमेंटने सांधी इंडस्ट्रीज लि.(SIL) ही सिमेंट कंपनी ताब्यात घेतली. त्यासाठी प्रवर्तकांचा पूर्ण 56.74 टक्के हिस्सा रु. 114.22 प्रती शेअर या भावाने एकूण रु. 5000 कोटींना विकत घेतला. अंबुजा सिमेंट ही भारतातील दुसर्या क्रमांकाची सिमेंट कंपनी आहे. या अधिग्रहणामुळे तिची उत्पादन क्षमता आणि बाजार हिस्सा दोन्ही वाढेल.
3 ऑगस्ट रोजी एस & पी ग्लोबलने पीएमआयचे (Purchasing Managers' Index) आकडे जाहीर केले. त्यानुसार भारतातील Service Actirity 62.3 झाली, जी जून महिन्यात 58.5 होती. जून 2010 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. मॅन्युफक्चरिंगचा आकडा जवळपास जैसे थे राहिला. विविध आठ क्षेत्रांच्या एकत्रित कामगिरीतही सुधारणा झाली. Unemployment Rate 8.45 वरून 7.95 वर आला. मान्सूनच्या हंगामात शेतीच्या कामामध्ये वाढ होते. त्याचा हा परिणाम असावा. आणि शेवटी बुधवार आणि गुरुवार रोजी बाजारात जो हाहाकार माजला. त्याविषयी –
Fitch ने यूएसच्या Long term foreign currency default रेटिंग AAA वरून AA + असे खाली आणले. तीन वर्षे तरी यूएसची अर्थव्यवस्था अशीच चिंताजनक अवस्थेत राहील. आता हयाचा परिणाम के रिसर्टकडून व्याजदरांबाबत कोणते धोरण अंगीकारण्यात येते, यावर होईल. एकूण काय, 20000 चा टप्पा करण्यास या महिन्यात तरी निफ्टी यशस्वी होईल काय? बाजाराचा भरवसा कुणी द्यावा?