आजही मराठवाडा दीनच! विकासात्मक झोळी रिकामी ,अनुशेष दूर करण्यासाठी नवीन आयोगाची आवश्यकता

पैठण येथे हुतात्म भाऊराव कानडे यांच्या स्मारकाच्या परिसराची झालेली दुरावस्था. (छाया - दादासाहेब गलांडे)
पैठण येथे हुतात्म भाऊराव कानडे यांच्या स्मारकाच्या परिसराची झालेली दुरावस्था. (छाया - दादासाहेब गलांडे)
Published on
Updated on
दादासाहेब गलांडे : इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी देशात लढा तीव्र होत असताना  हैदराबादच्या निजाम रजाकाराचे  संस्थानच्या  मराठवाड्यात अन्याय -अत्याचाराने  जनता त्रस्त झाली होती. देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याप्रमाणे  हैदराबाद मुक्ती संग्रामाचा लढा मराठवाड्यात लढला गेला. १५ ऑगस्ट १९४७ ला देशाला स्वातंत्र्य मिळाले. तिरंगा ध्वज दिल्लीत फडकवला गेला.
भारतात अनेक संस्थाने होती, यातील जवळजवळ सर्व संस्थानेभारतात विलीन झाली. केवळ तीन संस्थानने विलीन होण्यास विरोध केला.  त्यापैकी हैदराबादचे निजाम संस्थाननच्या निजामाने विलनीकरणास विरोध केला. उलट त्याने मराठवाड्यातील जनतेवर अन्याय अत्याचार जुलूम सुरू ठेवला यातून निजमाविरुद्ध  मराठवाड्यातील जनता पेटून उठली. शेवटी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभाई पटेल यानी  पोलिसासह रणगाडे पाठवून ऑपरेशन पोलो १०९ घंट्याचे राबवून निजामराजवटीचा खात्मा करून केला.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १४ महिन्यांनी मराठवाड्यात स्वातंत्र्याची खरी पहाट १७ सप्टेंबर १९४८ ला उजाडली. मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. या लढ्यात अनेक हुतात्म झाले. या लढ्यात पैठण तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे.  मराठवाड्याची केवळआश्वासनावरच बोळवण आजपर्यंत  झालेली दिसत आहे. आजही मराठवाडा हा विकासापासून कोसो दूर असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा सुरू होता. या लढ्यामध्ये पैठण तालुका अग्रेसर होता. हैदराबाद राज्यात पैठणला  महत्त्वाचे शहर मानले जायचे, कारण  गोदावरी नदी असल्यामुळे अलीकडचा भाग हा हैदराबाद संस्थानामध्ये होता तर पलीकडचा भाग हा भारताचा होता .पैठण शहर व्यापाराची बाजारपेठ होती. निजामांचे शेवटचे टोक मानल्याजायचे.
निजामाविरुद्धचा पहिला सत्याग्रह हा पैठण शहरातील कापड मंडई येथे झाला. कापड मंडईत तिरंगा ध्वज फडकावून चळवळीला सुरुवात झाली . या चळवळीत शाळकरी मुलांसह महाविद्यालयीन तरुणाचा मोठा भरणा होता. चळवळ पुढे नेली यात अनेकांना हुतात्म झाले. पैठण तालुक्यातील अनेक स्वातंत्र्यसेनानी या जुलमी निजामाच्या राजवटीविरुद्ध लढत होते. संघर्ष करत होते. एकंदरीत मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीत पैठण तालुक्याचा खारीचा वाटा आहे.

हा सोहळा उत्सव म्हणून राज्यभर साजरा व्हावा

मराठवाड्यातील जनतेने जीवाची पर्वा न करता निजाम राजवटीला भुमिगत लढा देऊन  राजवट खिळखिळी करुन टाकली होती . मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी राज्य शासनाने हुतात्माचे स्मरण, कृतज्ञता म्हणून हा मुक्तिसंग्राम दिनाचा सोहळा राज्याच्या पातळीवर  उत्सव  म्हणून साजरा व्हावा अशी  जनभावना आहे. यासाठीमुख्यमंत्री कार्यालयाने पुढाकार घ्यावा अशी मागणी प्रतिसाद संघटनेसह  सामाजिक कार्यकर्ते दिनेश पारिक यानी वेळोवेळी प्रशासनाकडे केलेली आहे .

विकास खुंटला

विदर्भाने महाराष्ट्रातसामील होताना अटी शर्ती घातल्या होत्या . मात्र मराठवाडा विनाअट सामिल झाला. मराठवाड्याच्या विकासासाठी ऐतिहासिक नागपूर करार १९५३ प्रमाणे मराठवाड्याचा अनुशेष भरला गेलेला दिसत नाही. आजघडीला मराठवाड्याने काय कमावले, काय गमावले, काय मिळवण्याचे शिल्लक आहे व कोणत्या क्षेत्रातील अनुशेषात मागे आहे, याचे अवलोकन होण्यासाठी नवीन सक्षम आयोगाची स्थापना होणे गरजेचे आहे नसता. मराठवाडा वैधानीक विकास मंडळाच्या अधिकारात  वाढ करून  विकासात्मक अधिकार द्यावेत .१९६० पासून महाराष्ट्रातील  सत्ताधाऱ्यांनी सदैव मराठवाड्यावर अन्याय केला आहे. दरवर्षी मराठवाड्याचे बजेट किती हेच गुलदस्त्यात आहे. विकासाला चालना मिळाली नाही .शासनाच्या या उदासीन धोरणामुळे  स्वातंत्र्य सैनिकाचे बलिदान व्यर्थ गेले कि  काय हा प्रश्न पडला आहे.

पैठण तालुक्यातील चळवळीतील स्वातंत्र्यसेनानी

भाऊराव कानडे, काशीनाथराव कुलकर्णी,नरहर देव,देविदास करोडगीर,निळकंठराव मुधलवाडकर, प्रभाकर कुलकर्णी, भगवंतराव कानडे,रामचंद्र कोरान्ने, बाळासाहेब पाटील, बलवंत यशवंत मापारी, यशवंत कोलते, रामनाथ श्रीमित्र, विठ्ठलराव बावकर, रामचंद्र जोशी,  सोनाजी तारू यांच्यासह अनेकांनी या चळवळीत झोकून दिले होते.

धोरणात्मक निर्णयाची गरज

 अन्याय अत्याचार या सगळ्यांमध्ये मराठवाड्यातील जनता चिरडून भरडून निघत होती. आणि ह्याच वेळेस जो एक अमोघ स्वातंत्र्यलढा लढला गेला जो इतिहासात दुर्लक्षित राहिला गेला. राजकारणात दुर्लक्षित राहिला गेला.  भारताच्या एकूण इतिहासातच दुर्लक्षित राहिलेला एक सर्वकषपणे जनतेने लढलेला लढा म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम होय .खऱ्या अर्थाने मराठवाडा हा सुजलम सुफलम व्हायला पाहिजे होता. विकासाचे वारे मराठवाड्यात वाहिले पाहिजे होते. मात्र आजही मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी  लागते हे दुर्दैव आहे. विकासात्मक धोरणाची गरज मराठवाड्याला आहे.
– जयंत  पाटील, अभ्यासक, पैठण
माझे आजोबा भाऊराव तात्याराव कानडे चांगतपुरीतून स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय होते. त्यांची लढ्यात महत्त्वाची भूमिका होती. निजाम त्यांच्या पाठीमागे दबा धरूनच होते १९४७ ला त्यांना गाठून क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. त्यांनी हौतात्म्य पत्करले. पैठण शहरात १९८२ ला स्वातंत्र्य लढ्याच्या स्मारकाची निर्मिती करण्यात आली. मात्र, आज या स्मारकाची दूरवस्था झाली आहे. शासनाने आमच्या कुटुंबातील एकाही व्यक्तीला आजपर्यंत सवलती दिलेल्या नाहीत. शासनाने स्वातंत्रयसैनिकांच्या पाल्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे .
सुधीर कानडे, पैठण 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news