

अंतरवाली सराटी; पुढारी वृत्तसेवा : जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या आड लपून तुम्ही आंदोलन संपवू नका, हे पाप तुम्हाला फेडावे लागेल. हा सरकारचा ट्रॅप आहे. अजय बारस्कर यांच्यासोबत आणखी 10 ते 15 माणसे असून, ते मला बदनाम करत आहेत. त्यांना काहीही बोलूदे. मी असल्या चिल्लर महाराजांना मानत नाही, असा पलटवार मनोज जरांगे यांनी बारस्कर महाराज यांच्यावर केला.
अंतरवाली सराटी येथे जरांगे पत्रकारांशी बोलत होते. मराठा आंदोलनात सक्रिय सहभाग असलेल्या अजय बारस्कर महाराज यांनी केलेल्या आरोपांचा जरांगे यांनी जोरदार समाचार घेतला.
मी उपोषण करत होतो. त्यामुळे माझ्या तोंडून त्या दिवशी अनावधानाने तुकाराम महाराज यांच्याबद्दल शब्द गेला. त्या वाक्याबद्दल माझी यापूर्वीच मी सपशेल माफी मागितली आहे. मात्र, उपोषण काळात बारस्कर यांनी मला पाणी पिण्याचा आग्रह धरला. मला पाणी पाजून त्यांना मोठे व्हायचे होते. मात्र, तेव्हाच मी त्यांना तेथून हाकलून लावले. त्या संतापातून माझ्यावर आरोप केले जात आहेत. हे षड्यंत्रही त्यातूनच सुरू झाले आहे, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
अजय बारस्कर यांचा एकेरी उल्लेख करत जरांगे म्हणाले, हा कसला महाराज आहे. तो तर बावळटकर आहे. त्यांच्या मागे कोणते नेते, मंत्री आहेत. हे मला माहीत आहे. त्यांनी मला शिकवण्याचा प्रयत्न करू नये. समाजाचे हित माझ्यासाठी सर्वात मोठे आहे. मी अजिबात हेकेखोर नसून समाजासाठी कट्टर आहे; मात्र तुकाराम महाराजांच्या आडून मला बदनाम करू नये, असे त्यांनी बारस्कर यांना सुनावले.