

पुणे, पुढारी वृत्तसेवा: पत्नीच्या खुनात न्यायालयीन बंदी असलेल्या एका तरूण बंदीने वडाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन मधुकर नरवाडे (31, रा.तांबे बिल्डींग, बजरंगवाडी, शिक्रापूर. मुळ रा. सावंगी-अवघडराव, ता. भोकरदन, जि. जालना) असे आत्महत्या केलेल्या न्यायालयीन बंदीचे नाव आहे.
2 जून 2022 रोजजी शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथे सचिन नरवाडे याने आपली पत्नी कांचन हिच्या चारित्र्यावर संशय घेऊन व नेहमी होणार्या भांडणातून तिचा स्वतःच्या शर्टने गळा दाबून खून केला होता. याप्रकरणात शिक्रापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात त्याला अटक होऊन न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली होती.
गुरूवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास न्यायालयीन बंदींना मोकळे सोडण्यात आले होते. साडेतीन वाजण्याच्या सुमारास बंदीवानांची मोजदात होत असताना त्यांना सचिन नरवाडे हा आढळून आला नाही. तेव्हा कारागृह कर्मचार्यांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा मृतदेह कारागृहातील हॉस्पीटल विभागाच्या बराक 2 जवळ असलेल्या वडाच्या झाडाला फाशी घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने अंगावर घेण्याच्या चादरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक अशोक काटे यांनी सांगितले. या संदर्भात कारागृह अधीक्षकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
आत्महत्या करण्यासारखी सचिनची अवस्था नव्हती. मागील चार दिवसांपूर्वीच त्याने घरून साडेचार हजार रूपयांची मागणी केली होती. आम्ही त्याला ते पाठविणार देखील होतो. परंतु, पोस्टाच्या तांत्रिक अडचणीमुळे आम्हाला त्याला पैसे पाठविता आले नव्हते. आमचा माणूस झाडावर चढून फाशी घेत असताना कारागृहातील कर्मचारी कुठे गेले होते.
– मृत सचिनचे नातेवाईक