आवारे खूनप्रकरणातील एकाला पुणे पोलिसांनी केले हवाली
पुणे, पुढारी वृत्तसेवा: तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्या खून प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पुण्यातून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
संदिप विठ्ठल मोरे ( गणेश मंदिरजवळ, आकुर्डी) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. शुक्रवारी भरदुपारी आवारे यांची तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या समोर कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी रात्री उशीरा चार ते पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये मोरे याचा समावेश असून तो पुण्यातील कर्वेनगर भागात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाला मिळाली होती. यानूसार पथकाने सापळा रचून मोरेला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पुढील कार्यवाहीसाठी त्याला तळेगाव दाभाडे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती खंडणी विरोधी पथक दोनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, उपनिरीक्षक श्रीकांत चव्हाण, अंमलदार सचिन अहीवळे, शैलेश सुर्वे, प्रदीप शितोळे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.

