Maldhok: शेतकऱ्यांचा मित्र माळढोक पक्ष्यांचे संवर्धन होण्याची गरज : डॉ. अविनाश राऊत

Maldhok: शेतकऱ्यांचा मित्र माळढोक पक्ष्यांचे संवर्धन होण्याची गरज : डॉ. अविनाश राऊत
Published on
Updated on


सोलापूर: सोलापूर जिल्ह्याचे वैभव असलेले नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथील माळढोक पक्षी अभयारण्यात १८ वर्षापूर्वी ३५ माळढोक पक्षी होते. मात्र, आज फक्त एक मादी पक्षी उरला आहे. याचे संवर्धन करणे काळाची गरज असून केंद्र, राज्य शासन आणि स्थानिक शेतकऱ्यांनी याचे संवर्धन करावे. नान्नज अभयारण्याला गतवैभव मिळाल्यास खऱ्या अर्थाने 'माझी वसुंधरा अभियन' यशस्वी होईल, असे मत पक्षी अभ्यासक व नेचर कॉन्झर्वेशन सर्कल सोलापूरचे सदस्य डॉ. अविनाश राऊत यांनी व्यक्त केले. ५ ते १२ नोव्हेंबर दरम्यान भारतात 'पक्षी सप्ताह'चे आयोजन केले जाते. त्यानिमित्त त्यांच्याशी संवाद साधला. Maldhok

डॉ. अविनाश राऊत यांनी सांगितले की, एकदा देश पातळीवरील पक्षी संमेलन भरले होते. त्या संमेलनासाठी पक्षांची छायाचित्रे पाठवायची स्पर्धा होती. त्यात मी भाग घेतला आणि मी काढलेली माळढोकसह इतर पक्षांची छायाचित्रे पाठवली. विशेष म्हणजे माझ्या माळढोक पक्षाच्या छायचित्रांची निवड झाली होती. आणि मी तेव्हापासून पक्षी अभ्यासाला सुरुवात केली.

१९७२ साली सोलापूरचे पक्षी तज्ज्ञ डॉ. बी. एस. कुलकर्णी यांना नान्नज येथे पहिल्यांदा हे पक्षी दिसले. त्यांनी ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. सलीम अली यांना याबद्दल माहिती दिली, व खात्री करण्यासाठी त्यांनी सोलापूरला येण्याची विनंती केली. डॉ.अली यांनाही एवढ्या मोठ्या प्रमाणात माळढोक नान्नज परिसरात दिसतो, हे पाहण्यासाठी त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहिले आणि हा माळढोक पक्षी असल्याची खात्री केली. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना याबद्दल कळविले. प्राणी आणि पक्षी याबाबत संवेदनशील असलेल्या इंदिरा गांधी यांनी नामशेष होत चाललेल्या माळढोक पक्षाचे संरक्षण आणि संवर्धन होण्यासाठी अभ्यास समिती नेमून नान्नज हे 'माळढोक पक्षी अभयारण्य' घोषीत केले.

डॉ. राऊत पुढे म्हणाले की, सोलापूर – तुळजापूर रोडवरील गंगेवाडी या माळढोक अभयारण्याच्या कार्यक्षेत्रात मॉन्टिगो हॅरीअर, पॅलिड हॅरिअर, कोर्सर, लांडगे, कोल्हा, इंडियन रोलर, युरोपियन रोलर, फ्रँकोलिन, मोर आदी पक्षी व प्राणी पाहावयास मिळतात. सोलापूर जिल्हातील निसर्ग प्रेमींनी तसेच नेचर कॉन्झर्वेशन व इतर संघटनांनी सोलापूर जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य जपण्याचे व जोपासण्याचे कार्य निरंतर चालू ठेवलेले आहे. त्यास प्रत्येक सोलापूरकरांनी सहकार्य केल्यास बळ मिळणार आहे.

Maldhok :ठळक मुद्दे :

१) बोरामणी परिसरात माळढोक पक्ष्याची एक मादी उडदाच्या शेतात आढळून आली आहे. नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या पक्षाचे संवर्धन करणे आवश्यक आहे.

२) हा पक्षी शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान करत नाही. उलट पिकावरील तसेच बांधावरील गवतावर तसेच माळरानावरील गवतातील अळ्या किटक कीड खाऊन पिकांचे संरक्षण करतो.

३) पक्षाची शिकार करू नये, अंडी नष्ट करू नयेत. त्याच्याबद्दल गैरसमज करून घेऊ नये. अभयारण्य परिसर तसेच माळरानावरील गवत, परिसरातील शेताच्या बांधावरील गवत पेटवून देऊ नये.

४) मोहोळ तालुक्यातील पोखरापूर परिसर हा माळरानाचा गवताळ प्रदेश आहे. येथे हा पक्षी आढळल्याच्या नोंदी आहेत. येथील शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तो दिसल्यास त्याचे संवर्धन करावे.

५) नान्नज (ता.उत्तर सोलापूर), बोरामणी, पोखरापूर (ता.मोहोळ), गंगेवाडी गवताळ प्रदेश (ता. तुळजापूर) या परिसरात माळढोक आढळतो.

मोहोळ तालुक्यातील पोखरापूर परिसरातील माळरानावर माळढोक दिसल्याच्या नोंदी आहेत.तो संपूर्ण गवताळ प्रदेश पादाक्रांत केला. मात्र आम्हाला तो आढळला नाही. येथील शेतकऱ्यांनी तो दिसल्यास त्याचे संवर्धन करावे.
– भरत छेडा, नेचर कॉन्झर्वेशन सर्कल, सोलापूर

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news