माळढोक, गिधाडांच्या प्रजाती धोक्यात; दुर्मिळ गिधाडांच्या भारतात फक्त नऊ प्रजाती अस्तित्वात | पुढारी

माळढोक, गिधाडांच्या प्रजाती धोक्यात; दुर्मिळ गिधाडांच्या भारतात फक्त नऊ प्रजाती अस्तित्वात

सुनील जगताप

पुणे : देशपातळीवर गेली अनेक वर्षे माळढोक वाचवा मोहीम राबवूनही तो पक्षी केवळ राजस्थान राज्यापुरता मर्यादित राहिला आहे. तशीच स्थिती निसर्गचक्रात महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या गिधाडांचीही झाल्याची चिंता राष्ट्रीय दुर्मीळ प्रजाती दिनानिमित्त पक्षिप्रेमींनी व्यक्त केली आहे. नैसर्गिकरीत्या कचरानिर्मूलन करणारी महत्त्वाची प्रजाती असणार्‍या गिधाडांची भारतामध्ये संख्या चांगली होती. परंतु, डायक्लोफिनॅक नावाच्या औषधांमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत त्यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.

पाळीव प्राण्यांना डायक्लोफिनॅक नावाचे वेदनाशामक औषध देतात. औषध घेतलेले असे प्राणी मेल्यानंतर ते खाल्ल्यामुळे गिधाडांमध्ये ते औषध जाते. त्यामुळे गिधाडांच्या प्रजननावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे देशातील गिधाडे दुर्मीळ गटात आली आहेत. केंद्र सरकारने व्हल्चर रेस्टॉरंट, गिधाड प्रजनन केंद्र आदी योजनाही राबविल्या. त्यालाही फारसे यश आलेले नाही.

दरम्यान, दुर्मीळ पक्षी म्हणून गणला जाणारा माळढोक आता दिसणेही दुर्मीळ झाले आहे. नान्नज अभयारण्यातील माळढोक नामशेष होत असून, महाराष्ट्रात केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतपत पक्षी आहेत. वाढत्या शहरीकरणाने त्यांचे रहिवास क्षेत्र झपाट्याने कमी झाले आहे.

हिमालयीन ग्रिफॉन (करडे गिधाड) ही एक गिधाडाची जात महाराष्ट्रात आढळत नाही. इतर गिधाडाच्या प्रकारांमध्ये पांढरपाठी गिधाड, राज गिधाड (लाल डोक्याचे गिधाड), युरेशियन ग्रिफॉन गिधाड (करडे गिधाड), पांढरे गिधाड (इजिप्शियन गिधाड), काळे गिधाड (सिनेरियस गिधाड) व लांब चोचीचे गिधाड यांचा समावेश आहे.

भारतात उरले फक्त 250 माळढोक

माळढोकची देशातील संख्या 250 च्या आसपास आहे. राजस्थानमधल्या डेझर्ट नॅशनल पार्कमध्ये सर्वाधिक म्हणजे 100 ते 125 माळढोक आहेत. तर अजमेर, पाली आणि टोंक जिल्ह्यात 25 ते 50 माळढोक आहेत. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांमध्येसुद्धा माळढोक आहेत. मध्य प्रदेश आणि गुजरातमधल्या माळढोकची संख्या कमालीची घटली आहे. देशात 1980 च्या दशकात दीड ते दोन हजार माळढोक होते. पण, अधिवास नष्ट होत गेल्याने माळढोकची संख्या पुढे कमालीची घटली.

सध्या भारतात गिधाडाच्या नऊ प्रजाती अस्तित्वात आहेत. माळढोकची परिस्थिती खूपच चिंताजनक आहे. माळढोकचे प्रजनन करता येऊ शकते. परंतु, आपल्या देशात अद्याप तो प्रयोग झालेला नाही. त्यांचे प्रजनन करणे गरजेचे आहे. कर्नाटकातील माळढोक नष्ट झाले आहेत. राजस्थानमध्ये काही माळढोक टिकून असून, त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे.

                                  – डॉ. सतीश पांडे (ज्येष्ठ पक्षी अभ्यासक)

Back to top button