

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूरमधील स्वाभिमानी मतदारांनी भारतीय जनता पक्षाची दहशत, दडपशाही, प्रलोभनांना व धार्मिक ध्रुवीकरणाच्या अजेंड्याला न जुमानता महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना विजयी केले. हा विजय जनतेचा महाविकास आघाडीवर असलेला विश्वास अधोरेखित करतो, असे प्रतिपादन काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने कोल्हापूरच्या मतदारांवर ही निवडणूक लादली होती. जाधव कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहत महाराष्ट्राने आजवर जपलेल्या राजकीय संस्कृतीचे प्रदर्शन भाजपने करायला हवे होते. मात्र, तसे न करता वेगवेगळे आरोप करण्यात आले. मात्र, कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने आजच्या निकालातून भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या राजकारणाला सडेतोड उत्तर दिले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्या दिवसापासून ही निवडणूक गांभीर्याने घेण्याची सूचना महाविकास आघाडीच्या सर्वच नेते आणि पदाधिकाऱ्यांना दिली होती. ज्येष्ठ नेते शरद पवारही या निवडणुकीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केले, त्यांच्या एकाजुटीमुळेच हा विजय साकारला, असेही थोरात म्हणाले.
काँग्रेस नेते तथा पालकमंत्री सतेज पाटील यांच्या मदतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील कोल्हापूरचे संपर्कप्रमुख मंत्री उदय सामंत आणि मंत्री हसन मुश्रीफ सतत सोबत राहिले. काँग्रेसच्या वतीने सर्वांचे आभार मानतो, अशीही भावना थोरात यांनी व्यक्त केली.
कोल्हापूरचे पालकमंत्री तथा गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे या निवडणुकीतील विजयासाठी मनापासून अभिनंदन. भारतीय जनता पक्षाकडून त्यांना घेरण्याचा प्रयत्न झाला. मात्र, बंटी पाटील सर्वांना पुरून उरले. आजच्या विजयाने हे अधोरेखित झाले, असेही ते म्हणाले.
दिवंगत चंद्रकांत जाधव हे सातत्याने कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कार्यरत होते. त्यांच्या आकस्मित निधनामुळे झालेली पोटनिवडणूक काँग्रेसने विकासाच्या मुद्दयावर लढवली. पण भाजपने या निवडणुकीत धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा रेटण्याचा प्रयत्न केला. पण कोल्हापूरच्या जनतेने भाजपचा धर्मांध विचार नाकारून कोल्हापूरचा विचार हा समतेचा, प्रबोधनाचा..! आणि कोल्हापूर छत्रपती शाहू महाराजांचे, महाराणी ताराबाईंचे…! आहे, हे दाखवून दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचलंत का ?