हज यात्रेसाठी २२ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज | पुढारी

हज यात्रेसाठी २२ एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज

वाशिम : अजय ढवळे

यंदा हज यात्रेसाठी २२ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. हज कमिटी ऑफ इंडियाने अर्ज भरण्याची तारीख वाढवली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल होती, त्यानंतर ही वाढवण्यात आली आहे. तसेच या यात्रेसाठी ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या व्यक्तींना परवानगी दिली जाणार आहे.

खुददाम-ए-हज कमिटीचे प्रशिक्षक हाजी इम्रान फकिरावाले म्हणाले की, २०२२ च्या हज यात्रेसाठी, हज कमिटी ऑफ इंडियाने ९ एप्रिल २०२२ रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. यामुळे भारतातील यात्रेकरूंना ऑनलाइन अर्ज भरण्याची आणखी एक संधी दिली जाणार आहे. ६५ वर्षापेक्षा अधिक वयोवृद्ध व्यक्तींना मात्र हज यात्रेसाठी अर्ज करता येणार नाही. परंतु, ज्यांचे वय ६५ वर्षे आहे, त्यांना मात्र अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी २२ एप्रिल २०२२ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सौदी अरेबिया सरकारच्या नव्या नियमावलीनुसार भारताच्या हज कमिटीने जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ही माहिती दिली आहे.

सौदी अरेबिया सरकारच्या हज आणि उमरा मंत्रालयाने एक नवीन घोषणा केली आहे की, यावर्षीची हज यात्रा काही अटींसह पूर्ण केली जाईल. यामधील अटींचा तपशीलही जाहीर करण्यात आला आहे. यावर्षी हज यात्रा ज्यांचे वय ६५ वर्षाखाली आणि मुख्य म्हणजे ज्यांचे कोविड लसीकरण झालेलं आहे त्यांनाच प्रवेश खुला करण्यात आला आहे. अजमीन-ए-हजला जाण्यापूर्वी ७२ तासांच्या आतील COVID-19 पीसीआर रिपोर्ट जमा करणे आवश्यक आहे. सौदी मंत्रालयाने असेही निर्देश दिले आहेत की, सर्व यात्रेकरूंनी आरोग्य सूचनांचे पालन करावे आणि हजचे कर्तव्य बजावताना त्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता राखण्यासाठी सर्व खबरदारीच्या उपाययोजना कराव्यात.

पासपोर्ट कालावधी डिसेंबरपर्यंत आवश्यक

अर्ज करण्यापासून दूर राहिलेले हज यात्रेकरू आता नव्याने अर्ज करू शकतात. त्यांचा पासपोर्ट २२ डिसेंबर २०२२ पर्यंत वैध असणे आवश्यक आहे. त्यामुळे हजला जाण्यास इच्छुक असलेल्या सर्वांनी नव्याने अर्ज प्रक्रिया करावी. २२ एप्रिल २०२२ पूर्वी जारी केलेला आणि ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत वैध भारतीय आंतरराष्ट्रीय पासपोर्ट मशीनद्वारे वाचनीय आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे हज अर्जदारांना हज २०२२ साठी त्यांचे अर्ज मागे घेण्याची परवानगी असल्याचे, हाजी मोहम्मद. इम्रान फकिरा वाले, प्रशिक्षक जिल्हा हज समिती यांनी सांगितले आहे.

Back to top button