चंदन शिरवाळे : अंडे आधी की कोंबडी ? याचे समाधानकारक उत्तर अद्याप कोणालाही देता आले नाही. प्रत्येकजण सोयीने उत्तर देत आला आहे. याची प्रचिती मंगळवारी विधान परिषदेत आली. विधान परिषदेचे कामकाज सुरू झाले. परंतु प्रश्नोत्तराचा तास पुकारण्याआधीच विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा उपस्थित करत नागपूर सुधार प्रन्यासच्या माध्यमातून मोठा भूखंड घोटाळा असल्याचा आरोप केला. अर्थातच त्यांच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नगरविकास विभागही मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडेच असल्यामुळे दानवे यांच्या आरोपाला धार आली होती. मात्र, पाच ते सात मिनिटांनंतर ही बाब संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर यांच्या लक्षात आली. पाटील यांनी आधी प्रश्नोत्तराचा तास घ्या, मगच पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आपला मुद्दा उपस्थित करा, असे दानवे यांना सांगितले.
पण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष करत दानवे यांच्याकडून घोटाळा कसा करण्यात आला, हे सांगण्याचा दांडपट्टा सुरू होता. त्यामुळे दरेकर यांनी पाटील यांना म्हणणे मांडू द्यावे तसेच आधी प्रश्नोतरांचा तास संपल्याशिवाय हरकत होऊ शकत नाही, असे सांगत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सत्ताधारी पक्षाकडून हरकत सुरू झाल्याचे पाहून राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य एकनाथ खडसे तसेच शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनी आधी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलू द्यावे, हे नियमानुसार असल्याचे त्यांनी सांगितले.
८३ कोटींचा भूखंड दोन कोटी रुपयांना देणे म्हणजे मंत्रिपदाचा दुरुपयोग आहे. या प्रकरणात न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. झोपडपट्टीसाठी राखीव भूखंड असताना असा हस्तक्षेप केल्यामुळे विद्यमान मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी खडसे यांनी केली. या मागणीमुळे जखमेवरच मीठ चोळल्याची भावना झालेल्या सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अशा स्थितीत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीला १५ मिनिटे, त्यानंतरही १५ मिनिटे कामकाज तहकूब केले.
कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आजच्या विषयपत्रिकेनुसार कामकाज झाले पाहिजे, अशी विनंती उपसभापतींना केली. त्यावर परवानगी दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलण्यासाठी उभे राहिले. काही उदाहरणे देत हा भूखंड घोटाळा नसल्याचे सांगण्याचा ते प्रयत्न करत होते. तर विरोधक आधी मांडलेल्या पॉईंट ऑफ इन्फर्मेशनच्या मुद्दयावर आम्हालाच बोलण्याची संधी द्या, अशी घोषणाबाजी करत होते. परंतु त्याकडे दुर्लक्ष करत आरोप केलेच आहेत, आता उत्तरही ऐका, असा टोला देत फडणवीस यांनी मारला. त्यानंतर आधी आम्हाला बोलू द्या, असा ओरडा करणारे विरोधक आपली मागणी विसरले आणि बाजी पलटत असल्याचे पाहून घोषणाबाजी करत राहिले.