

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी महसूल राज्यमंत्री असताना वाशिम जिल्ह्यातील 37 एकर गायरान जमीन वाटपात दीडशे कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. सत्तार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झालेल्या महाविकास आघाडीच्या सदस्यांनी घोषणाबाजी केल्याने कामकाज दिवसभरासाठी स्थगित करणे भाग पडले.
प्रश्नोत्तराचा तास संपताच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा कथित जमीन घोटाळा सभागृहात मांडला. सुप्रीम कोर्टाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असतानाही कृषिमंत्र्यांनी एका व्यक्तीला फायदा मिळवून दिला आहे. हा पदाचा दुरुपयोग आहे. ही बाब अतिशय गंभीर आहे. या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून अब्दुल सत्तार यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांनी राजीनामा नाही दिला तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी अजित पवार यांनी सभागृहात केली.
सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला. कृषी विभागाला वेठीस धरण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितलं आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? अशी विचारणा अजित पवारांनी फडणवीसांना केली.गेल्या सहा महिन्यात त्यांच्याबद्दल सतत काहीतरी घडत आहे. महिला नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात आली. असा आरोप त्यांनी केला.