विधानसभेतून : अन् मुख्यमंत्र्यांचा पारा चढला !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Published on
Updated on
  • दिलीप सपाटे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तसे शांत आणि मितभाषी स्वभावाचे मानले जातात. कामात व्यस्त असणारे मुख्यमंत्री फारसे चर्चेतही रमलेले दिसत नाहीत. पण, या अधिवेशनात ते काहीसे अस्वस्थ असल्याचे जाणवत होते. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्यावर नागपूर येथील कथित भूखंड घोटाळ्याचे आरोप उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून झाले. या आरोपावरून विधान परिषदेचे कामकाज बंद पाडण्यात आले. विधानसभेतही दोन दिवसांत हा मुद्दा थोडा का होईना, चर्चेत येताच होता. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांच्यावर असा कोणता आरोप झाला होता. त्यातून त्यांची अस्वस्थता जाणवणारी होती. गुरुवारी या अस्वस्थेला त्यांनी सभागृहातच वाट मोकळी करून दिल्याचे चित्र दिसले.

प्रसंग होता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी अध्यक्षांबाबत वापरलेले अपशब्द ! एरव्ही शांत असणारे मुख्यमंत्री एवढे भडकले की सारे सभागृह अवाक् झाले. जयंत पाटील यांनी अध्यक्षांना उद्देशून 'निर्लज्ज' शब्दाचा वापर करताच संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी यांना निलंबित करा, अशीच मागणी केली. त्यांनी यारे म्हणत आपल्या आमदारांनाही पुढे बोलविले. धेट मुख्यमंत्र्यांनीच अशी मागणी केल्याने विरोधी पक्षही शांत झाला. त्यानंतर कामकाज तहकूब झाले आणि अपेक्षेप्रमाणे जयंत पाटील यांच्या सारख्या ज्येष्ठ नेत्याचे निलंबन झाले. मात्र, त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचा पारा एवढा का चढला असावा याची जोरदार चर्चा विधान भवनात रंगली. विरोधी पक्षाच्या आमदारांनी कथित भूखंड घोटाळ्याचे आरोप करणे स्वाभाविक होते. पण, विधान परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य आमदारांनी हा विषय तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून उपस्थित करणे शिंदे गटाला फारसे आवडलेले नाही. तेथे हा प्रश्न चर्चेला आला नाही. पण, भाजप आमदारांनी हा मुद्दा कसा काय मांडला असावा, याचीही चर्चा शिंदे गटात आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही दिल्लीत पत्रकार परिषदेत बोट ठेवले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा संयम ढळला का, यावरही तर्कवितर्क लावले जात आहेत.

चौकशीचा फार्स की फास?

विधानसभेत प्रचंड गदारोळाने दिशा सालियनच्या मृत्यूची एसआयटी चौकशी जाहीर झाली आहे. या प्रकरणात भाजप नेते आणि आमदार आधीपासूनच शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांना टार्गेट करत आले आहेत. विशेषतः केंद्रीय मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे हे तर सातत्याने दिशा आणि अभिनेता सुशांतसिंह राजपूत याचा खून झाला असून याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचे नाव घेऊन चौकशीची मागणी करत आले आहेत. गुरुवारी सभागृहात नितेश राणे यांनीच प्रथम दिशा सालियनच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली. ही मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केल्याने आता पुढे काय होणार, खरंच आदित्य ठाकरे हे या चौकशीत अडकणार का? असा सवाल केला जात आहे. ही चौकशी ठाकरे कुटुंबीयांना शांत करण्यासाठीचा एक फार्स ठरतो की खरच त्यात काही तथ्य समोर येते, हे काळच ठरवेल!

दिशा सालियन मृत्यू प्रकरणानंतर विरोधकांनी पलटवार म्हणून पूजा चव्हाण प्रकरण सभागृहात उपस्थित करत अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी झाला नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news