नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यातील विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची ३१ डिसेंबरपर्यंत आधार नोंदणी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, आधार नोंदणी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही विद्यार्थ्याला शालेय पोषण आहार किंवा सरकारच्या इतर कोणत्याही योजनांपासून वंचित ठेवण्यात येणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी झालेल्या चर्चेत आमदार संजय बनसोडे, अशिष शेलार, जयंत पाटील, अभिमन्यू पवार यांनी सहभाग घेतला.
शालेय पोषण आहार वाटपासंदर्भात उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, आधार कार्ड नोंदणी पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारच्या 'सरल' या प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना धान्य दिले जात आहे. एखादा विद्यार्थी अनुपस्थित असेल, तर त्याच्या घरी धान्य पॅक करून पोहोचविण्यात येते. राज्यातील शाळांमध्ये आधार नोंदणीची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी मशिन देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थी शिकत असतील, तर त्यांच्या घरी जाऊन आधार नोंदणी पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती केसरकर यांनी दिली.