भंडारा, पुढारी वृत्तसेवा : लाखनी शहरातील केसलवाडा फाटा परिसरातील जुन्या बंद हॉटेलमधील वेल्डिंगच्या सहाय्याने जुने लावलेले साहित्य काढत असताना भिंत पडून वेल्डिंग मजुराचा मृत्यू झाल्याची घटना आज (दि. ११) गुरुवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. धर्मराज हरिश्चंद्र सिडाम (वय ३०, रा. गिरोला, ता. साकोली) असे मृत मजुराचे नाव आहे.
धर्मराज सिडाम हा लाखनी शहरातील एका वेल्डिंग दुकानात मजुरीचे काम करत होता. आज तो आपल्या लहान भावासह नेहमीप्रमाणे वेल्डिंगच्या दुकानात मजुरीसाठी आला होता. दरम्यान, दुकानालगत असलेल्या बंद हॉटेलमधील साहित्य काढत असताना संततधार पावसामुळे जीर्ण झालेली भिंत अचानक धर्मराजच्या अंगावर पडली. लगेच त्याच्या भावाने त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले. मात्र, उपचारा आधीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिका-यांनी घोषित केले.