नागपूर; पुढारी वृत्तसेवा : राज्यात उघडकीस आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेतील (टीईटी) घोटाळ्याचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत पोहोचले आहेत. टीईटी परीक्षा घेण्यासाठी अपात्र असतानाही अशा कंपन्यांना पात्र केले नसते; तर टीईटी घोटाळा घडलाच नसता, त्यामुळे अपात्र कंपन्यांना पात्र करून हा घोटाळा कुणी केला, याची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत केली.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत २१ डिसेंबर रोजी राखून ठेवण्यात आलेल्या खुलासा करण्याची मागणी केली. टीईटी परीक्षेच्या घोटाळ्यात एका मंत्र्यांनी स्वतःच्या घरातील सदस्यांना फायदा मिळवून दिला आहे, असे सांगत पवार यांनी हा प्रश्न चर्चेला घेण्याची मागणी केली. या मागणीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी टीईटीचा प्रश्न राखून ठेवला नसल्याचा निर्णय दिला. या निर्णयावर संतप्त होत विरोधी पक्षाने सरकारविरोधात घोषणा देत सभात्याग केला. त्यावर भाजपचे सदस्य संजय कुटे यांनी शिक्षक परीक्षा घेण्यासाठी अपात्र कंपन्यांना पात्र केल्यानेच हा घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली.
देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत सभात्याग करणाऱ्या विरोधी पक्षाच्या सदस्यांची खिल्ली उडवली. स्वतःच्या सत्ताकाळातील घोटाळे बाहेर काढणारा हा पहिलाच विरोधी पक्ष आहे. असा विरोधी पक्ष आपण कधी पाहिला नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला. मंत्र्यांवर आरोप करायचे आणि बाहेर निघून जायचे. बाहेर माध्यमांसमोर बोलून आरोप चालवायचे, हा नवीन प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे आम्ही यांना सोडणार नाही जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही फडणवीस यांनी दिला.
अब्दुल सत्तारांच्या मुलींना टीईटी अंतर्गत नोकरी लागलेली नाही. टीईटीने आणि आयुक्तांनी त्यावेळीच याबाबतचा खुलासा केला आहे, असे फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. विरोधक आरोप करून पळ काढत आहेत, असे सांगत त्यांनी सत्तार यांच्या मुलींना क्लीन चिट दिली.