चंद्रपूर: कर्ज बाजारीपणामुळे शेतकऱ्याने गळफास घेत जीवन संपवले

चंद्रपूर
चंद्रपूर

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा: चिमूर तालुक्यातील वाकर्ला येथील एका शेतकऱ्याने कर्जामुळे स्वतःच्या शेतात गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना आज (24 जुलै) पहाटेच्या सुमारास उघडकीस आली आहे. प्रभाकर मारुती माळवे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. चिमूर तालुक्यातील प्रभाकर यांच्याकडे साडेसात एकर शेती होती. दरवर्षी ते शेती कसत होते. ते पूर्वी कापूस व सोयाबीनचे पीक घेत होते. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापूस व सोयाबीन हे दोन्ही पीक हातातून गेल्याने ते आर्थिक संकटात होते. त्यांनी आंबोली येथील महाराष्ट्र बँकेचे शेतीकर्ज तर चिमूरयेथील पतसंस्थेमध्ये सोने गहाण ठेवून कर्ज घेतले होते. शेती कसण्यासाठी ट्रॅक्टर देखील खरेदी केला होता. त्याकरीतासुध्दा कर्ज घेतले होते.

दरवर्षी येणाऱ्या अस्मानी संकटामुळे शासकीय , खासगी कर्ज चुकविण्याच्या विवंचनेत प्रभाकर माळवे होते. दरम्यान जीवन संपवण्याच्या आधी तीन दिवसांपासून ते वैफल्यग्रस्त होते. आज सोमवारी पहाटे ते शेतावर गेले होते. परंतु ते परत आलेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या मुलांनी शेतात जावून पाहिले असता शेतातील झाडाला त्याचा देह लटकलेला आढळला.

सदर घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आणि शवविच्छेदनासाठी चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेह पाठवला. मृतकाच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी आहे. प्रभाकर माळवे हे घरचे कर्ते होते. त्याच्या निधनाने कुटूंबिय पोरके झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र चांदे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक रामटेके, शिपाई अमित उरकुडे अधिक तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news