यवतमाळ : क्षुल्लक कारणावरून शनिवारी (ता. १४) सायंकाळी यवतमाळ आणि उमरखेड तालुक्यात दोन वेगवेगळ्या खुनाच्या घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. यवतमाळ तालुक्यातील आकपुरी येथे शेतकऱ्याचा, तर उमरखेड तालुक्यातील कोरटा येथे ५० रुपयांच्या देवाणघेवाणीतून एका व्यक्तीचा खून केल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटनेतील मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुधाकर महादेव बोटरे (वय ४५, रा. धानोरा), तर दुसऱ्या घटनेत दत्ता चिंमणराव बरगे, अशी दोन्ही घटनेतील मृतांची नावे आहेत.
यवतमाळ तालुक्यातील धानोरा येथील सुधाकर बोटरे यांची आकपूरी शेतशिवारात शेती आहे. शनिवारी (दि.१६) दुपारी सुधाकर बोटरे शेतात जात होते. अशात शेजारील शेतकरी रमेश कुळसंगे यांनी रस्त्यात काटे टाकले होते. त्यावरून दोघांमध्ये वाद झाला. दरम्यान, रमेशने रागाच्या भरात सुधाकरवर हल्ला करीत मारहाण केली. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले होते. परिसरातील नागरिकांनी जखमी सुधाकरला शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दुसऱ्या घटनेत उमरखेड तालुक्यातील कोरटा येथील दत्ता बरगे या तरुणाचा मित्र असलेल्या माधव तोरकड यांच्यासोबत ५० रुपयांच्या देवाण घेवाणीवरून शुक्रवारी दुपारी वाद झाला होता. या वादात दत्ता बरगे याने गोदाजी यांना शिवीगाळ केल्याने त्याच्या मुलाने त्याला ढकलले. यामध्ये दत्ता हा डोक्यावर कोसळल्याने गंभीर जखमी झाला. रुग्णालयात नेताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.

